तुम्ही मला बोलवा मी लगेच येईन – स्व. लतादीदींनी नागपूरकरांना दिले होते आश्वासन

नागपूर : ६ फेब्रुवारी – १९६२ साली माझा नागपुरातील एक कार्यक्रम उधळला गेला होता, म्हणून मी परत नागपूरकरांचे परत तोंड पाहायचे नाही – इतकी मी वेडी, नादान वा खाष्ट नाही आणि भित्री तर नाहीच नाही, असे प्रतिपादन भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांनी १९ नोव्हेंबर १९९६ रोजी नागपूरकरांतर्फे आयोजित नागरी सत्कारात केले होते. त्यावेळी त्यांनी तुम्ही मला बोलवा, मी लगेच येते असे आश्वासनही त्यांनी या कार्यक्रमात दिले होते.
नागपूर महापालिकेतर्फे लतादीदींचा १९ नोव्हेंबर १९९६ रोजी नागरी सत्कार करण्यात आला होता. यावेळी नागपूरच्या पहिल्या महिला महापौर कुंदाताई विजयकार होत्या. सत्काराला उत्तर देतांना त्या म्हणाल्या होत्या, आजचा सत्कार हा लता मंगेशकर या गायिकेचा नसून तो पार्श्वगायन या संगीत माध्यमाचा सत्कार आहे, गायनासाठी लागणारा स्वर ही देवदत्त देणगी मला माझ्या वडिलांकडून म्हणजे मास्टर दीनानाथ यांच्याकडून लाभली. वडिलांकडून संगीताची देणगी तर गुरुजनांकडून त्या देणगीवर संस्कार मिळाले. ज्येष्ठ व प्रतिभाशाली संगीत दिग्दर्शकाच्या सुरावटी म्हणजे चाली मला गेला मिळाल्या व श्रेष्ठ कवींचे उत्कट काव्य माझ्या स्वराला सामर्थ्य द्यायला मला लाभले, सर्व थोर कलावंतांच्या सहकार्याने, आशीर्वादाने मी सतत ५० वर्ष गात आहे, माझ्या गाण्यांमध्ये रसिकांना जे जे असामान्य, अलौकिक वाटले ते सर्व माझ्या गुरुजनांच्या आशीर्वादाचे व संस्कारांचे फळ आहे, माझ्या गाण्यात जे जे सामान्य आहे, त्याचे दायित्व मी आनंदाने, नम्रपणे स्वीकारते.
एक आगळे महत्व मी यासाठी मानते की महाराष्ट्रातल्या प्राचीन राजधानीत आज माझा सत्कार होतो आहे,महाभारत या महाकाव्याला स्वतः महर्षींनी म्हणजे कवी व्यासांनी हा जय नावाचा इतिहास आहे, असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले होते. थोडं घडलेले आणि ९९ टक्के कल्पित असे काव्य म्हणजे पुराण. आणि जे प्रत्यक्ष घडलेले आणि मग लिहिलेले तो इतिहास त्या जय म्हणजेच महाभारत या ग्रंथामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख नाही. त्याकाळी विदर्भ हे वैभवशाली राज्य होते, विदर्भातले एक ज्येष्ठ कवी ग्रेस यांची एक ओळ मला या ठिकाणी स्मरते ती अशी,
” सगळ्याच ऋतूंना मिळते, दुःखाचे उत्कट दान
निसर्गाने मानवाला दिलेले, हे ऋतूचे दान,
किती सुंदर असते, किती शुभ असते,
किती आनंदमयी, उदार परोपकारी असते,
हिवाळ्यातील पानांची पतझळ, उन्हाळ्यातील गोधुलीची बेला,
पावसाळ्यातला मध्यरात्रीला हिरव्यागार पानात तप्तपणारा दीर्घस्वर,
हे सारे फार करुणामय, उदासवाणे, अंतर्मुख करणारे असते
निसर्ग नसे मानवाला उत्कट दान देतो, तसे उत्कट दान एखादी संस्कृती एका प्रांताला देते. निष्कपट हृदयाचे व उदार मनाचे उत्कट दान विदर्भाला ईश्वराने दोन हाताने दिले आहे, या अगत्याचा मी कालपासून अनुभव घेत आहे, कलाकाराला व त्यांच्या साथीदाराला ज्या चांदीच्या ताटात जेवायला घालते, ते चांदीचे साहित्य त्या कलाकाराच्या नकळत त्याच्या सामानात ठेऊन द्यायचे हा उदारपणा, दानशूरपणा व अतिथ्यशीलता फक्त विदर्भातच दिसते , उजव्या हाताचे दान डाव्या हाताला कळू द्यायचे नाही, हा मनाचा सच्चेपणा व मोठेपणा फक्त विदर्भातच दिसतो, असे त्यांनी सांगितले. अतिथ्यशीलतेचा,अगत्याचा अतिरेक असेल थोडी झिंग असेल, पण झपाटलेली माणसेच इतिहास घडवितात हे मान्य करायलाच हवे.
जे मनापासून आवडले ते निर्भयपणे डोक्यावर घेणे जे आवडले नाही ते तितक्याच निर्भयतेने फेकून देणे, ही विदर्भाला मिळालेली आणखी एक देणगी आहे. माझे वडील मास्टर दीनानाथ मला नेहमी सांगायचे लता कंपनी तोट्यात आली की आम्ही विदर्भाचा दौरा काढतो, ६ महिन्यात सगळे ठीकठाक होते. कलावंताची इतकी आत्मीयतेने कदर करणारा हा आपला प्रांत जो मला भारतीय, मराठी संस्कृतीचा ठेवा वाटतो, त्या प्रांतावर त्या विदर्भावर मी रुसून बसले आहे, असे काही जण मला सांगत असतात.
४०-४५ वर्षांपूर्वी माझ्या कार्यक्रमात काही गैरसमजुतीमुळे गोंधळ झाला, तो राग मनात धरून मी नागपूरला येत नाही, असा काही लोकांचा गैरसमज आहे, तक्रार आहे, टीकाही आहे. राग, तक्रार आणि टीका हेही विदर्भाला मिळालेले खास दान आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात आवर्जून सांगितले. काळाच्या ओघात ४० वर्ष सहज विरून गेली, नागपूरकरांवर मी रागावले म्हणून मी येथे येत नाही, हा आरोप अगदी मिथ्या आहे, कारण ज्या सांगली शहरात माझ्या वडिलांच्या घरादाराचा लिलाव झाला, बेअब्रू झाली, त्या सांगली शहरात मी हॉस्पिटलच्या मदतीसाठी कार्यक्रम केला. ज्या शहरात वडिलांचा विपन्नावस्थेत मृत्यू झाला, त्या पुणे शहराचाही मी द्वेष करत नाही. उलट दीनानाथ प्रतिष्ठान स्थापून त्या प्रतिष्ठानाद्वारे अनेक कार्यक्रम आम्ही पुणे येथे केले. ते शहर वाईट किंवा दृष्ट असे मानण्याइतकी मी मूर्ख नाही, आणि दीर्घद्वेषी नाही.
उलट विदर्भातले अनेक कवी माझे आवडते कवी आहेत, त्यांच्या अनेक कविता मी आनंदाने प्रेमाने गायल्या आहेत. आचार्य राम शेवाळकर ते गझलकार सुरेश भटांपर्यंत माझे अनेक स्नेही इथे आहेत. एन के. पी साळवे, वसंतराव साठे हे माझ्या अगदी जवळचे स्नेही आहेत. वडीलधारे आहेत, फक्त आपल्या शहरी कार्यक्रमाच्या निमित्ताने येण्याची संधी लाभली नाही, ते नियतीच्या मानत नसावे पण आज आपल्यासमोर मनमोकळे बोलायची संधी माजी महापौर अटलबहादूर सिंह यांच्यामुळे मिळाली, असे त्यांनी स्पष्ट केले. नागपूरकर लवकरच कार्यक्रम सादर करण्याची संधी देतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमानंतर लतादीदींचे नागपुरात तीन कार्यक्रम झाले. ही आठवण नागपूर कधीच विसरू शकत नाही.

Leave a Reply