समाज-माध्यमा, तुझे लय भारी उपकार…- प्रमोद तेंडुलकर

समाज-माध्यमे म्हणजे अथांग पसरलेला सागर आहे. सागर कोणालाही नाही म्हणत नाही‌. नदी, नाले, ओढे सर्वांचा समावेश करून घेतो. तसेच या समाज- माध्यमांचे आहे. तुम्ही कधीही, कितीही व्यक्त होऊ शकता किंवा जे व्यक्त झाले आहेत त्यांना प्रतिक्रिया देऊ शकता. एकमेकाला प्रोत्साहन देऊन आनंद मिळवू शकता. कारण आता प्रसिध्दीसाठी तुम्हाला हात जोडून/चहापान देऊन विनंती करावी लागणार नाही. ‘साभार परत-संपादक किंवा सा.प.-सं.’ असे शेरे वाचून निराश होण्याची वेळ येणार नाही.

गेल्या दशकभरात समाज-माध्यमांनी तरुणाई, प्रौढ, ज्येष्ठ या सर्वांच्याच मनावर गारुड केल्याचे लक्षात येत आहे. मग ते व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर इ. इ. कोणतेही असो. काही तर प्रेमात पडलेत किंवा व्यसनात अडकलेत असे म्हटले तरी गैर ठरणार नाही. कारण आजचे जग फास्ट ट्रॅकवरून जात आहे. शाळेत, कॉलेजात जाणारी मुले त्यांची स्वतःची शाळा, कॉलेजे, क्लासेस यांचे टाइमटेबल जुळवण्याची कसरत करीत असतात. नोकरीला जाणारी मुलं किंवा व्यावसायिक बारा बारा तास कामात घालून थकून येतात. मग टाईम पास म्हणून थोडा वेळ टीव्हीवरील कार्यक्रम बघण्यात घालवतात. त्यामुळे कुटुंबातील संवाद हरवला आहे. विद्यार्थी किंवा नोकरी करणारे यांच्यासाठी संगणक, स्मार्ट फोन अपरिहार्य झाला आहे. दहा पंधरा वर्षांपासून व्हाट्सअप चालू झाल्यावर प्रथम तरुणाई त्यात वेळ घालवू लागली. या माध्यमापासून त्यावेळी अनभिज्ञ असलेले ज्येष्ठ त्यांच्याविषयी तक्रारीचे सूर आळवू लागले. ‘काय दिवसभर त्या मोबाईलमध्ये ड़ोकं खूपसून बसतात? वेळेकाळेचे भान नाही.’ असे संवाद घराघरात घुमत असत. एखाद्या घरात वडील, आजोबा शिघ्रकोपी असतील तर मग षडाष्टक नाटकाचा प्रयोग सुरू. कोणतेही नवीन तंत्रज्ञान येते तेव्हा कमी-अधिक फरकाने असे होतेच. आणि आता ज्येष्ठही या माध्यमाच्या प्रेमात पडलेत. कोऱोना व टाळेबंदीमुळे या माध्यमांचे महत्त्व अधिक पटू लागले. एकाकी नागरिकांना मोबाईल हा आधार वाटू लागलाय. आता घरातील तीन पिढ्या या समाजमाध्यमाच्या गुलाम झालेत असे म्हटले तर वावगे ठरू नये. प्रत्येक गोष्टीला सन्माननीय अपवाद असतात तसे येथेही असतील. (अतिज्येष्ठ, हे तंत्रज्ञान आत्मसात न करू शकलेले किंवा मर्यादा सांभाळणारे). आता व्हाट्सअप, फेसबुक इ. केवळ वाढदिवस, सणांच्या शुभेच्छा, भावांजली एवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही. तर कविता, विनोद, कथा लेख, मनोगत, टीका टिप्पणी या सर्व प्रकारातून लोक स्वतःहून व्यक्त होताहेत.
चाळीस पन्नास वर्षांपूर्वी ठरावीक दैनिकेच होती. साप्ताहिक मासिकांचा जमाना होता. नवोदिताने कथा, लेख, कविता लिहिली तरी छापली जाण्याला मर्यादा होत्या. मासिक, साप्ताहिकांना साहित्य पाठविल्यास परतीच्या पोस्टेजसह पाठवावे लागत असे. कधीतरी एखाद्याचे प्रसिध्द व्हायचे नाहीतर ‘साभार परत. -संपादक किंवा ‘सा‌. प. – सं.’ अशा शे-याने परत यायचे. (इथेही शे-यावरून आपल्या लेखनाची संपादकांच्या दृष्टीने गुणवत्ता किंवा लेखनाकडे पाहण्याची संपादकांची मानसिकता याचे दर्शन होत असे.) मग असे आपले परत आलेले साहित्य मित्रमंडळींना वाचायला देणे व त्यांच्याकडून कौतुक करून घेणे एवढेच हाती राहत असे. पण आता तसे नाही. तुम्ही कधीही, कितीही व्यक्त होऊ शकता. जे व्यक्त झाले आहेत त्यांना प्रतिक्रिया देऊ शकता. एकमेकाला प्रोत्साहन देऊन आनंद मिळवू शकता. कारण आता तुम्हाला विनंती करावी लागणार नाही. ‘साभार परत’ किंवा ‘सा. प.’ होणार नाही.
समाज-माध्यमे म्हणजे अथांग पसरलेला सागर आहे. सागर कोणालाही नाही म्हणत नाही‌. नदी, नाले, ओढे सर्वांचा समावेश करून घेतो तसेच समाज-माध्यमांचे आहे. किती आणि कसा वापर करायचा हे वापर करणाराने ठरवायचे. सकारात्मक दृष्टी ठेवून आनंद मिळविण्यासाठी यांचा वापर करता येतो असे माझे मत आहे.
आता तुम्हाला सवय झाली आहे ना ? मग थोडा वेळ विचार करा- ही समाजा-माध्यमे बंद झाली तर… काय होईल हो ? नको रे बाप्पा असेच म्हणाल ना ?
कारण आता समाजमाध्यमांशी अनेक घटकांची नाळ जोडली गेली आहे. समाजमाध्यमे ज्येष्ठांचे मित्र, एकाकी राहणारांचे जोडीदार झाले आहेत. म्हणून अशाच समाजमाध्यमप्रेमींना म्हणावेसे वाटत असेल-

समाज-माध्यमा,
झाला आहे अम्हां साक्षात्कार,
तूच आहेस आता आमचा आधार, तुझे अम्हावरी लय भारी उपकार !

प्रमोद तेंडुलकर

Leave a Reply