मेमरीतला डेटा – अविनाश पाठक

तारुण्यातला आगळावेगळा अनुभव

आपण आयुष्यात मोठमोठ्या व्यक्तींना भेटावे, त्यांच्याशी संबंध प्रस्तापित व्हावे, असे मला लहानपणापासून नेहमीच वाटायचे अशा सेलिब्रेटी मंडळींचे मला कायम अप्रूप होते. सुदैवाने महाविद्यालयीन जीवनात अशा काही सेलिब्रेटींना भेटण्याचे ओझरते योग जरूर आले, मात्र संपर्क आणि संबंध प्रस्तापित झाले नव्हते.
महाविद्यालयीन शिक्षण आटोपून आधी वृत्तछायाचित्रणाच्या व्यवसायात आलो, नंतर वयाच्या २१व्या वर्षीच दूरदर्शनचा वृत्तछायाचित्रकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अगदी सुरुवातीच्या दिवसातच एकदम ठोक भावात काही सेलिब्रेटींसोबत थोडा वेळ नव्हे तर तब्बल दोन दिवस एकत्र घालवण्याची आणि स्नेहबंध निर्माण करण्याची मला संधी मिळाली. त्यातल्या अनेकांशी नंतर दिर्घकाळ माझे जिव्हाळ्याचे संबंध कायम राहिले. त्याच्याच काही आठवणी मी शेअर करणार आहे.
दूरदर्शन साठी काम सुरु करून जेमतेम दोन महिने झाले होते. अचानक एक दिवस यवतमाळ जिल्ह्यातील वणीला स्त्री लेखिकांच्या संमेलनाचे वृत्तसंकलन करून पाठवावे असा संदेश मिळाला. वाहन व्यवस्थेसाठी नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंशी संपर्क साधण्याचा निरोप मिळाला. त्यानुसार मी कुलगुरू कार्यालयाशी संपर्क साधला. शनिवारी सकाळी ११ वाजता कुलगुरू कार्यालयातून वाहन जाणार असून तिथेच सामानासह यावे, असे मला सांगण्यात आले.
कुलगुरू कार्यालयातून मला एका वाहनातून कुलगुरूंच्या बंगल्यावर नेण्यात आले. तिथे अनेक मान्यवर मंडळी जमली होती. त्यातल्या बहुतेक सर्वांना मी फक्त व्यासपीठावर बघितले होते. किंवा त्यांची नावे वृत्तपत्रातून वारंवार वाचली होती. प्रत्यक्ष भेटण्याची आणि बोलण्याची वेळ क्वचितच आली होती. त्या मान्यवरांमध्ये विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. गोहोकर , सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक डॉ. मधुकर आष्टीकर, सौभाग्यवती आष्टीकर, ख्यातनाम साहित्यिक कवी अनिल, आकाशवाणीचे वृत्तसंपादक हरीश कांबळे, विभागीय समाजकल्याण अधिकारी चंद्रकांत ठवकर, विदर्भ साहित्य संघाचे बाबुराव देहाडराय, नागपूर मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. शास्त्रकार हे सर्वच होते. थोड्याच वेळात नागपूर विद्यापीठाच्या मेटॅडोरने आम्ही सर्व वणीकडे रवाना झालो.
अश्या खाश्या मंडळींसोबत प्रवास करण्याची ही माझ्या आयुष्यातली पहिलीच वेळ होती. या सर्व मंडळींसमोर मी एकदमच कच्चा लिंबू होतो. त्यामुळे मेटॅडोर मध्ये बसल्यावर मी मुक्याची आणि बघ्याची भूमिका स्वीकारली होती. मात्र, या सर्वच मान्यवरांनी स्वतःहूनच माझी ओळख करून घेतली. डॉ. गोहोकरांशी माझे आधी फोनवर बोलणे झाले होते. त्यामुळे त्यांनी माझी चौकशी करत थोड्याच वेळात सर्वांशी माझा परिचय करून दिला. गाडीत या सर्व मान्यवरांच्या काव्य शास्त्र विनोदावरच चर्चा सुरु होत्या. मात्र त्यातही डॉ. आष्टीकर, हरीश कांबळे आणि चंद्रकांत ठवकर अधून मधून मलाही त्या गप्पांमध्ये ओढत होते. परिणामी माझीही भीड चेपण्यास सुरुवात झाली होती.
जवळजवळ दीड तासांच्या प्रवासानंतर वर्धा रोडवरच्या जांबला गाडी थांबली. तिथे एक प्रसिद्ध हॉटेल आहे, या हॉटेलमध्ये सर्वांनी चहा घेण्याचे ठरले. सर्व खाली उतरले, हॉटेलच्या दारासमोरच एका हातगाडीवर ताजीताजी सीताफळे विकायला ठेवली होती. ही सीताफळे पाहून कवी अनिल यांना मोह आवरला नाही, त्यांनी सगळ्यांसाठीच छान पिकलेली सीताफळे घेतली. हॉटेल समोरच्या मोकळ्या जागेत खुर्च्या टाकून सर्वानीच सीताफळावर ताव मारणे सुरु केले. सीताफळातला गोड गर खाऊन बिया थुंकणे ही प्रक्रिया सुरु झाली होती. अचानक कवी अनिलांना स्फूर्ती झाली. मला ते विचारते झाले, ” पाठक या फळाला सीताफळ का म्हणतात?” मी क्षणभर निरुत्तर झालो, त्यावर अनिलांनीच उत्तर दिले, ” या फळात आपण गर खातो आणि बिया थुंकतो, हा गर सफरचंदासारखा म्हणजेच ऍपल सारखा गोड लागतो इंग्रजीत थुंकणे या शब्दाला स्पीट असा प्रतिशब्द आहे, म्हणून याचे नाव इंग्रजांनी स्पीट ऍपल असे ठेवले. आपण भारतीयांनी त्याचे सीताफळ असे नाव केले.” कवी अनिलांचा या युक्तिवाद मला क्षणभर पटून गेला. त्याचवेळी ” अप्पा तुम्ही या पाठकांना भलसलते शब्द शिकवू नका, तरुण पोरगा आहे तो ” असे आष्टीकरांनी सांगताच एकच खसखस पिकली. आमचे चहापान आटोपले त्या हॉटेलचा मालकही साहित्यप्रेमी असावा साहित्यिक मंडळी चहा घ्यायला आली म्हटल्यावर त्याने स्वतः येऊन चौकशी केली. निघतांना डॉ. गोहोकर पैसे द्यायला गेले तर त्याने पैसेही घेतले नाही. मेटॅडोरच्या ड्रायव्हरने गाडी दूर सावलीत उभी केली होती, आम्ही बाहेर आल्यावर गाडी दिसली नाही त्यावेळी आपल्या मिश्किल शैलीत कवी अनिल विचारते झाले, ” अरे आपल्या विद्यापीठाची मोठ्या ढोर कुठे गेली?” आणि पुन्हा एकदा हशा पिकला.
जांबवरून आम्ही वणीला पोहोचलो तेव्हा दुपारचे तीन वाजत होते, तिथे आमच्या स्वागताला दस्तुरखुद्द प्राचार्य राम शेवाळकर उभे होते. शेवाळकरांना मी यापूर्वी एक वक्ता म्हणून व्याख्याने देतानाच पाहिले होते. त्यांचीही त्या दिवशीच माझी ओळख झाली. त्यानंतर उदघाटन समारोहाच्या वेळी ख्यातनाम मराठी लेखिका गिरिजा कीर, योगिनी जोगळेकर, वसुंधरा पटवर्धन यांचीही माझी भेट झाली. गिरिजा कीर यांच्या लेखनाचा मी शालेय जीवनापासूनच फॅन होतो. योगिनी जोगळेकरांचेही साहित्य मी खूप वाचले होते. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा या देखील आनंददायी ठरल्या.
यथावकाश संध्याकाळी उदघाटन आटोपले, रात्रीची जेवणे आटोपल्यावर आता पथारी कुठे टाकायची हा प्रश्न आला. तितक्यात आम्हा सर्व मंडळींची सोय शासकीय विश्रामगृहात केली असल्याचे शेवाळकरांनी सांगितले. मग शासकीय विश्रामगृहात सर्व मंडळी पोहोचल्यावर आपापले सामान टाकले. आणि समोरच्या लॉनमध्ये खुर्च्या टाकून आमची गप्पांची मैफल रंगली त्यात गिरिजा कीर, नागपूरच्या लेखिका शकुंतला खोत, कवी अनिल, बाबुराव देहाडराय, हरीश कांबळे, चंद्रकांत ठवकर असे आम्ही सर्वच होतो. रात्री एक वाजेपर्यंत ही मैफिल अशीच रंगली होती.
दुसरा दिवस भरगच्च कार्यक्रम होते, सकाळी कविसंमेलन, दुपारी कथाकथन, परिसंवाद आणि संध्याकाळी समारोप असा एकामागे एक कार्यक्रमांचा क्रम होता. इथेही नवनवी मंडळी भेटत होती, आशा बगे या लेखिका म्हणूनच मला माहित होत्या, त्यादिवशी कथाकथनाच्या निमित्ताने त्यांचाही परिचय झाला. त्याशिवाय पुष्पा काणे, लीना रस्तोगी, दुर्गा कानगो अशा साहित्यिक मंडळींची माझी भेट झाली. माझ्यासारख्या साहित्यवेड्यासाठी ती एक पर्वणीच होती.
रविवारी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम चालले. त्यानंतर पुन्हा विश्रामगृहाच्या लॉनवर मैफिल बसलीच. आजतर सर्वच अजूनच रंगात आले होते. रात्री ठवकर साहेब, कवी अनिल, हरीश कांबळे, गिरिजाताई हे सर्वच वेगवेगळे किस्से सांगत होते. माझ्यासारख्याला हा एक आगळावेगळा अनुभव होता.
सोमवारी सकाळी आठ वाजता आम्ही परतीचा प्रवास सुरु केला. विश्रामगृहातून निघताना नानासाहेब शेवाळकरांचा निरोप घेऊन आम्ही निघालो शनिवारी निघतांनाच्या तुलनेत आता परतीच्या प्रवासात आम्हा सगळ्यांमधलाच परकेपणा गळून पडला होता. कवी अनिलांना मी अप्पासाहेब म्हणायला लागलो होतो. तर डॉ. आष्टीकरांना त्यांच्या सर्वमान्य असलेल्या भाऊसाहेब या नावाने हाक मारायला सुरुवात केली होती. येतानाच्या प्रवासातल्या डॉ. शास्त्रकार वणीलाच थांबल्या होत्या. त्याऐवजी गाडीत डॉ. गोहोकरांच्या सुविद्य पत्नी विमलताई गोहोकर या होत्या. परतीच्या प्रवासात अप्पासाहेब देशपांडेंना (कवी अनिल) चक्क गाण्याच्या भेंड्या खेळायची इच्छा झाली. मग थोडा वेळ तोही प्रयोग झाला. जांबला चहापाणी करून आम्ही साडेअकराच्या सुमारास नागपुरात पोहोचलो.
या दोन दिवसाच्या सहवासातून ज्या मान्यवरांशी संपर्क आला त्यातल्या अनेकांशी नंतर दीर्घकाळ संपर्क टिकला. गिरिजाताई कीर यांनी तर मला लहान भाऊ म्हणून घोषित केले होते. नागपुरात माझे घर हे एक वाङ्मयीन माहेर म्हणूनच त्या सांगायच्या. भाऊसाहेब आष्टीकर, नानासाहेब शेवाळकर यांचे आणि माझे संबंधही दीर्घकाळ टिकले.
एकूणच ही सर्व मोठी मंडळी फक्त कर्तृत्वानेच नाही तर मनानेही मोठी आहेत. आणि मान्यवर असले तरी शेवटी आपल्यासारखेच ते आहेत, हे या दोन दिवसांच्या संपर्कातून लक्षात आले. हेही नसे थोडके. माझ्या ऐन तारुण्यातल्या काळात आलेला हा आगळावेगळा अनुभव होता.

अविनाश पाठक

Leave a Reply