‘जुमला’ भारतासाठी आणि ‘नोकऱ्या’ चीनसाठी – राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

नवी दिल्ली : ४ फेब्रुवारी – काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशातील विविध मुद्य्यांवरून राहुल गांधींकडून सातत्याने पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली जाते. आता त्यांनी बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करून आणि मोदी सरकारच्या मेक इन इंडिया मोहिमेवरून टीका केली आहे.
“ ‘जुमला’ भारतासाठी आणि ‘नोकऱ्या’ चीनसाठी! मोदी सरकारने असंघटीत क्षेत्र नष्ट केलं आणि सर्वात जास्त रोजगार संधी निर्माण करणारे एमएसएमई क्षेत्र नष्ट केले आहे. परिणामी ‘मेक इन इंडिया’ आता ‘बाय फ्रॉम चायना ’ झालं आहे.” असं राहुल गांधी यांनी ट्वीट केलं आहे.
तसेच, “मोदी सरकारने २०२१ मध्ये ४६ टक्के आयात चीनकडून केली. बेरोजगारीने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. मागील ५० वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी आज भारतात आहे. मोदींनी मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया मोहिमेबाबत गाजावाजा केला, मात्र जो रोजगार युवकांना मिळाला पाहिजे होता तो मिळाला नाही आणि जो होता तो नष्ट झाला. मोदी सरकारने लघु उद्योग, छोटे उद्योगांचा पैसा घेऊन तो करोडपती, अब्जोपतींना वाटला.” असा आरोपही राहुल गांधी यांनी केलेला आहे.
याचबरोबर, “आता दोन भारत आहेत एक अतिशय श्रीमंतांचा भारत आणि दुसरा गरीबांचा या दोन्ही भारतांच्या दरम्यानची दरी दिवसेंदिवस वाढत आहे. गरीब भारताजवळ रोजगार नाही, पण त्याबद्दल कोणीच बोलत नाही. राष्ट्रपतींनी त्यांच्या अभिभाषणात एक शब्दही उच्चारला नाही. देशभरातील तरुण रोजगार शोधताहेत. त्यांना फक्त रोजगार हवा आहे, परंतु मोदी सरकार त्यांना रोजगार देऊ शकत नाही आहे,” असं देखील काँग्रेस खासदार राहुल गांधी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत बोलताना म्हणाले होते.
तर, दोन भारत कसे निर्माण झाले, असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी, “रोजगार, लघू आणि मध्यम उद्योग आणि असंघटीत क्षेत्रात याची निर्मिती झाली. या क्षेत्रातून कोट्यवधी रुपये हिसकावून घेत तुम्ही देशातल्या मोजक्या श्रीमंतांना दिले. गेल्या सात वर्षात तुम्ही लघू आणि मध्यम उद्योगांवर आक्रमण केलंय. नोटाबंदी, त्यापाठोपाठ जीएसटी आणि करोनाकाळात त्यांना तुम्ही कोणतीच मदत केली नाही,” असा आरोपही केलेला आहे.

Leave a Reply