कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना अटक

सातारा : ४ फेब्रुवारी – साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी व्यसनमुक्ती संघटनेचे दंडवत आणि दंडूका असं आंदोलन केले. यावेळी विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी व महिला नेत्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सातारा पोलिसांनी त्यांना पिपरंद (ता. फलटण) राष्ट्रसंत गुरुवर्य दीक्षित आश्रमातून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना साताऱ्यात आणण्यात आलं.
आंदोलनादरम्यान करोना नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांच्यासह १२५ जणावर विविध कलमान्वये सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला. आंदोलनादरम्यान बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात आणि याचे पुरावेदेखील असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख केला होता.
आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर प्रचंड गर्दी जमली होती. त्या सर्वांनी करोना नियमाचं उल्लंघन केलं. यामुळे पोलिसांनी प्रकाश सदाशिव जंत्रे उर्फ बंडातात्या कराडकर, विकास शंकर जवळे, मनोज निंबाळकर यांच्यासह १२५ जणांवर गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी त्यांना सातारा शहर पोलिस ठाण्यात आणलं आहे. यावेळी आंदोलनाची आणि वक्तव्याची चौकशी करण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिस ठाणे परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बंडातात्या कराडकर यांनी यावेळी नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचं सांगत काहीजणांची नावंदेखील घेतली. पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? असंही ते पत्रकारांना म्हणाले. तसंच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख केला. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा असं आव्हानच त्यांनी पत्रकारांना दिलं. तसंच आपण नावं घेतली आहेत त्यांनी पुरावा मागितलं तर सिद्ध करु शकतो असंही म्हणाले. सुप्रिया सुळेंनी बंडातात्या खोटं बोलत आहेत सांगावं असं आव्हानही त्यांनी दिलं.
विधानसभेत हा प्रश्न मांडला असता आणि मंजूर झाला असता तर अशा प्रकारचं आंदोलन करता आलं नसतं. पण मंत्रिमंडळातील मूठभर आमदारांनी एकतर्फी निर्णय घेत महाराष्ट्रावर दारुविक्रीचा हा अत्याचार लादला आहे. याविरोधात एकच संस्था तळमळीने काम करत आहे ती म्हणजे व्यसनमुक्त युवक संघ आहे. फक्त समाजाच्या कल्याणासाठी गेली २५ वर्ष आम्ही हे काम करत आहोत. आज शासनाला इशारा देण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आलं,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
बंडातात्या कराडकर पुढे म्हणाले की, “लोकांवर भयंकर असा निर्णय लादण्यात आला आहे त्यावर आम्ही नाराज आहोत. अत्यंत शांततेत आम्ही आंदोलन करत होतो. हातात काठ्या असल्याने पोलिसांचा गैरसमज झाल्याने त्यांना रोखलं होतं. काठ्या बाजूला ठेवून आंदोलन करण्यास आंदोलनाची परवानगी दिल्याने आम्ही पोलिसांचे आभारी आहोत. आम्हाला आधी पुढे जाऊन देणार नसल्याचं कळलं होतं. हे आंदोलन येथे थांबणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर उग्र रुप घेईल. त्यानंतर राज्य सरकारवर वाइन विक्रीची जी धुंदी चढली आहे ती कमी होईल आणि हा निर्णय मागे घ्यावाच लागेल”.

Leave a Reply