आंदोलनकर्त्या गरोदर महिलेने आंदोलनस्थळीच दिला बाळाला जन्म

बीड : ४ फेब्रुवारी – गेल्या दहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या एका महिलेनं आंदोलनस्थळीच बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी पहाटे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच त्यांनी बाळाला जन्म दिला आहे. या घटनेनंतर पोलीस पथक रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पण संबंधित महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांची मदत नाकारली असून त्यांचा लढा सुरूच आहे. व्यवस्थेवरचा आपला विश्वास उडाला असल्याचं सांगत त्यांनी सरकारी उपचार नाकारले आहेत.
मनीषा विकास काळे असं बाळाला जन्म देणाऱ्या 23 वर्षीय मातेचं नाव आहे. त्या पारधी समजातील असून गेल्या दहा दिवसांपासून बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरकुलासाठी उपोषण करत आहेत. त्यांच्यासोबत उपोषणात त्यांचे चुलते अप्पाराव भुजा पवार आणि पती विकास काळे देखील उपोषण करत आहेत. दोन जीवांची महिला गेल्या दहा दिवसांपासून उपोषण करत असून देखील प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं आहे. अशा अवस्थेत मनीषा यांनी गुरुवारी पहाटे आंदोलनस्थळीच बाळाला जन्म दिला आहे.
सकाळी आठच्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर, रुग्णवाहिका घेऊन शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बाळाला आणि मातेला रुग्णालयात घेऊन जाण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पण मनीषा यांच्या नातेवाईकांना सरकारी उपचार नाकारले आहेत.
बीड जिल्ह्यातील वासनवाडी शिवारात अप्पाराव पवार राहतात. त्यांची पुतणी मनीषा विकास काळे ह्या देखील पतीसह त्यांच्यासोबत वास्तव्याला आहेत. काही दिवसांपूर्वी अप्पाराव यांना घरकुल मंजूर झालं आहे. असं असून देखील ग्रामपंचायत घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देत नाहीये. त्यामुळे अप्पाराव हे आपल्या कुटुंबासह 24 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. दरम्यान मनीषा यांची प्रसूती झाली. तरीही प्रशासनानं त्यांची मागणी मान्य केली नाही. त्यांचा लढा सुरूच आहे.

Leave a Reply