महापालिका स्टेशनरी घोटाळा प्रकरणी औषधी भांडार प्रमुखाला अटक

नागपूर : ३ फेब्रुवारी – नागपूर शहरासह राज्यभरात गाजत असलेल्या महापालिकेतील स्टेशनरी घोटाळय़ांतर्गत आर्थिक गुन्हे शाखेने तीन कंत्राटदार, दोन कर्मचार्यांनंतर आता महापालिकेतील औषधी भंडार प्रमुखाला अटक केली आहे. प्रशांत भातकुलकर असे या अटकेतील आरोपीचे नाव आहे.
नागपूर महापालिकेत खरेदी करण्यात येणाऱ्या स्टेशनरीमध्ये ६७ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे पुढे आले आहे. मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी संजय चिलकर यांना प्रथम स्टेशनरीच्या खरेदीत मोठय़ाप्रमाणात घोळ झाल्याचे दिसून आले होते. त्यांचा संशय बळावल्यानंतर त्यांनी साहित्य खरेदीतील अनेक फाईल तपासल्या असता त्यांना त्यांच्याच स्वाक्षर्या या बनावटी आढळून आल्या होत्या. परिणामी ही बाब त्यांनी वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर चिलकर यांनी यासंदर्भात पोलिसात रितसर तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला. आर्थिक बाबींशी निगडीत हे प्रकरण असल्यामुळे हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वळते करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत साहित्य पुरवणारे तीन कंत्राटदार हे दोषी आढळून आले होते. शिवाय, घोटाळय़ात समाविष्ट असलेले दोन कर्मचारी यांना पोलिसांनी आधीच अटक केली होती. दरम्यान, या प्रकरणात महापालिकेचे औषधी भंडार प्रमुख देखील पोलिसांच्या चौकशीत दोषी आढळल्याने त्यांनाही अटक करण्यात आली आहे. सदर घोटाळय़ातील भातकुलकर हे सहावे आरोपी आहेत. त्यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. स्टेशनरी घोटाळय़ात भातकुलकर यांच्याकडून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता असून अनेक मोठी नावे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी पोलिसांनी कंत्राटदार पद्माकर कोलबा साकोरे (वय ५५), अतुल साकोरे (वय ४0), मनोहर साकोरे (रा. न्यू नंदनवन), सामान्य प्रशासन विभागाचे लिपिक मोहन रतन पडवंशी, ऑडिटर मोहम्मद अफाक अहमद आदींना अटक केलेली आहे.
महापालिकेच्या विविध विभागांसह झोन कार्यालयांना पुरवठा करण्यात आलेल्या स्टेशनरी व प्रिंटिंग साहित्यात ६७ लाखांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. महापालिकेच्या विविध विभागांना मनोहर साकोरे व त्यांच्या नातेवाईकांच्या फर्मच्या माध्यमातून स्टेशनरीचा पुरवठा केला जातो. यात मनोहर साकोरे अँण्ड कंपनी, स्वस्तिक ट्रेडिंग, गुरुकृपा स्टेशनरी, एस. के. एंटरप्रायजेस व सुदर्शन आदी कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांकडून आरोग्य विभागाला कोविड कालावधीत साहित्याचा पुरवठा न करता बिल उचलण्यात आले. २0 डिसेंबर २0२0 ते २१ मार्च २0२१ या कालावधीत विविध विभागांना स्टेशनरी साहित्याचा पुरवठा न करता ६७ लाखांची बिले उचलण्यात आल्याचे निदर्शनास आले.

Leave a Reply