पोलीस असल्याची बतावणी करून केली वृद्धाची फसवणूक

नागपूर : ३ फेब्रुवारी – समोरच्या परिसरात हत्या झाली आहे, आम्ही पोलीस आहोत. जमाव संतप्त आहे. लूटमार होते आहे. तुम्ही तिकडे जाऊ नका. तुमच्या जवळील पैसे, सोने आणि मौल्यवान वस्तू रुमालामध्ये बांधून खिश्यात ठेवा अशी बतावणी करून एका ज्येष्ठ नागरिकांना घेरून त्यांची फसवणूक केल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. आरोपींनी वृद्धाला भीती दाखवून हातचलाखीने हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेतील आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. ज्याच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. महत्त्वाचे म्हणजे वृद्धांची फसवणूक करून त्यांच्या जवळील ऐवज लंपास करण्याची पद्धत ही इराणी टोळीची असल्याचे तपासात उघड झाल्याने, शहरात इराणी टोळी सक्रिय झाली आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागपूर शहरातील अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे 68 वर्षीय नीलकंठ रंगारी हे विजेचे बिल भरण्यासाठी घरून निघाले होते. बिल भरणा केंद्र जवळच असल्याने ते पायी जात असताना एकाने त्यांची वाट अडवली. मी पोलीस कर्मचारी आहे. पुढे एकाची हत्या झाली आहे, परिसरात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांची मोठी तपासणी सुरू आहे असं सांगितले. हे ऐकून नीलकंठ रंगारी यांच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव दिसताच, आरोपींनी त्यांच्यावर आणखी दबाव आणायला सुरुवात केली. तुमच्या जवळ सोन्याचे दागिने असेल तर रुमालमध्ये बांधून खिशात ठेवा असा सल्ला दिला. त्याच वेळी भामट्यांच्या टोळीतील दुसरा साथीदार देखील तिथे आला आणि त्याने सुद्धा हत्या झाल्याने तणाव निर्माण झाला असल्याची भीती दाखवली. त्यामुळे वृद्ध नीलकंठ रंगारी यांनी त्यांच्या जवळ असलेले सोन्याची चैन आणि दोन अंगठ्या काढल्या आणि रुमालात ठेवण्यात सुरुवात केली. त्याचवेळी त्या दोघांनी आम्ही मदत करतो म्हणून सांगत त्यांनी हात चालखी करत ते दागिने लंपास केले.
नीलकंठ रंगारी हे घाबरून घरी गेले. तेव्हा त्यांनी रुमाल उघडून बघितले तेव्हा त्यात दागिने नसल्याचे लक्षात आले. त्यांनी या घटनेची तक्रात अंबाझरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. ज्यामध्ये आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला.

Leave a Reply