परमवीर सिंह हेच अँटिलिया प्रकरणाचे मास्टरमाइंड, राष्ट्रीय तपास यंत्रणा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे – नवाब मलिक

मुंबई : ३ फेब्रुवारी – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर जी स्फोटके ठेवण्यात आली होत, त्या प्रकरणाचे मास्टरमार्ईंड परमबीर सिंह हेच आहेत. मात्र, राष्ट्रीय तपास यंत्रणा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. सचिन वाझे हा परमबीर सिंह यांच्याच टोळीचा भाग आहे. परमबीर सिंह ठाण्यात पोलीस आयुक्त असतानाही त्यांचे भाजपच्या नेत्यांना हाताशी धरुन अनेक उद्योग सुरु होते. अँटिलिया प्रकरणानंतर बदली झाल्यानंतर परमबीर सिंह यांनी खोटे आरोप करुन अनिल देशमुख आणि महाविकासआघाडी सरकारला बदनाम केले, असे नवाब मलिक यांनी सांगितले. ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
यावेळी नवाब मलिक यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेसह केंद्रीय यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न होत आहे. संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांविरुद्धही ईडी याचप्रकारे कारवाई करत आहे. देशभरात केंद्रीय तपास यंत्रणांकडून हेच उद्योग सुरु आहेत. महाराष्ट्रात कितीही दबाव निर्माण केला तरी सरकार झुकत नाही हे पाहून भाजपकडून वेगवेगळे डावपेच खेळले जात आहेत. परंतु, केंद्रातील भाजप सरकारने सत्तेचा कितीही दुरुपयोग केला तरी महाविकासआघाडीच्या तिन्ही पक्षांमधील कोणताही नेता दबावाला बळी पडणार नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले.
या पत्रकारपरिषदेत नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या कनेक्शनवर बोट ठेवले. सचिन वाझेला पुन्हा पोलीस दलात घेण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात झालेली नाही. सचिन वाझे पोलीस दलातून निलंबित झाला असला तरी तो परमबीर सिंह यांच्यासाठी काम करत होता. ज्याठिकाणी परमबीर सिंह यांची पोस्टिंग व्हायची, त्याठिकाणी सचिन वाझे असायचा. परमबीर सिंह यांच्यासारख्या पोलीस अधिकाऱ्यांची एक टोळीच होती, असेही नवाब मलिक यांनी म्हटले.

Leave a Reply