तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे देशभरातील ३७ राजकीय पक्षांना सामाजिक न्यायासाठी एकजूट होण्याचे आवाहन

चेन्नई : ३ फेब्रुवारी – तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी सामाजिक न्यायासाठी एकजूट करण्याचे आवाहन काँग्रेससह देशभरातील ३७ राजकीय पक्षांना केले आहे. वैविध्यपूर्ण असलेली आपली सांस्कृतिक एकता केंद्रातील कट्टरतावादी आणि धार्मिक नेतृत्वामुळे धोक्यात आली आहे. अत्याचारित जनतेच्या भल्यासाठी आणि सामाजिक न्यायाच्या सुरक्षेसाठी ‘अखिल भारत संघटने’त सहभागी होण्याचे आवाहन स्टॅलिन यांनी राजकीय पक्षांना केले.
‘सामाजिक न्यायासाठी अखिल भारत संघटना’ स्थापन करण्याची घोषणा स्टॅलिन यांनी प्रजासत्ताकदिनी केली होती. त्यानंतर बुधवारी त्यांनी देशभरातील ३६ राजकीय पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहून या संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासह राष्ट्रीय जनता दल, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या अण्णा द्रमुक या पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिले आहे. ‘कट्टरतावादी आणि धार्मिक वर्चस्वामुळे आपला अद्वितीय, वैविध्यपूर्ण, बहुसंस्कृती असलेल्या देशाचे ऐक्य धोक्यात आले आहे. समानता, स्वाभिमान, सामाजिक न्याय यांच्यावर विश्वास असलेल्यांविरोधात या कट्टरतावादी शक्ती लढत आहेत. त्यामुळे त्यांविरोधात लढण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे. यामुळे काय राजकीय फायदा होणार, हा प्रश्न महत्त्वाचा नसून आपल्या प्रजासत्ताकाची विविधतावादी ओळख पुनस्र्थापित करण्यासाठी आपण हे पाऊल उचलणे गरजेचे आहे,’ असे स्टॅलिन यांनी सांगितले.

Leave a Reply