मनातल्या मनातले : सौ. अमृता खोलकुटे

     नावात काय आहे ? 

आज एक जुना ग्रुप फोटो नजरेस पडला . निरखून बघितलं आणि एकेकाची नावं आठवू लागले .काहींच्या मूळ नावा ऐवजी त्यांना दिलेली नावेच प्रकर्षाने आठवायला लागली.
कसं असतं नाही . आपण गंमतीने एखाद्याचं नाव ठेवतो आणि मूळ नावच विसरुन जातो.
आम्ही नुकतेच काॕलेजमधे गेलो तेव्हा मुलांनी केस वाढवायची फॕशन निघाली. एका परिचितांच्या मुलाने केस वाढवले आणि त्याचे लटाऱ्या नावाने बारसे झाले आणि खऱ्या नावाचा विसरच पडला.त्यांच्याकडे पत्रिका द्यायची वेळ आली तेव्हा काही केल्या नाव आठवेना. गुपचुप त्यांच्या घरी जाऊन पाटीवरचे नाव बघून आल्याचे आठवतय मला .
आम्ही मुंबईला असतांना आमच्या इमारतीत एका कुटुंबात तीन मुली त्यांना आम्ही गंमतीनी काही नावं ठेवली . एक दिवस त्यांच्याकडे हळदीकुंकवाला जाण्याचा योग आला त्यावेळी मोठी मुलगी बाळंतीण होती . तिची विचारपूस करायची होती पण काही केल्या तिचं खरं नावच आठवेना. इतकं लाजल्या सारखं झालं ! शेवटी काय म्हणतात बाळ- बाळंतीण म्हणत वेळ मारुन नेली झालं .
माझ्या नणंदेच्या एका मैत्रिणीला आमच्या घरी गोपाळकृष्ण गोखले म्हणत . एक दिवस ती घरी आली तेंव्हा नणंदबाई शेजारी गेल्या होत्या . त्यांना आवाज दिला . त्यांचं तिकडून सारखं कोण आलय वहिनी ?
अहो ! तुमची मैत्रिण !
कोण आली ?
आता आली का पंचाईत ! खरं नाव आठवेना . तिच्या समोर गोपाळकृष्ण गोखले कसं म्हणणार ? मैत्रिणीनीच ” अगं मी आलेय ” आवाज दिला म्हणून वाचले मी.
बरेचदा टोपण नावं इतकी रुढ होतात की खरी नावच आठवत नाहीत किंवा पुढल्या पिढीला माहितच होत नाहीत .
आमच्या सासूबाईंच्या नात्यातल्या एकीनी त्यांच्या वंशवृक्षाचं काम करायचं मनावर घेतलयं . आता सासूबाई तर नाहीत पण त्यांच्या नात्यातल्या काहींची नावं गुंड्या , पोट्या , धोंड्या ?????? अशी ऐकलेली . काळाच्या ओघात नातीही दुरावलेली . आता यांच्या वारसांना शोधून यांची खरी नावं काढायची तरी कशी ?
एका मावशीच्या मुलीला ” टिटुल ” म्हणायचे ! आता ? 🤭

      अशी मजेदार नावं लक्षात रहातात कायम. 
      टोपण नावच ती  ! जो पर्यंत टोपण काढत नाही तो पर्यंत खऱ्या नावाचा पत्ता लागणार तरी कसा ?  
      काही वेळा  मुला मुलींची नावं इतकी विचित्र ठेवतात. भावा बहिणीची  जोडीची नावं . आकाश आणि धरती .  पुढील आयुष्यात त्यांनी क्षितिजासारखे राहू नये म्हणजे झाले. !  माझ्या मुलीच्या शेजारी तर राम आणि सीतेला भाऊ बहीणच करुन टाकले मैथिली आणि श्रीराम . 

ट ला ट आणि री ला री जोडून नावं ठेवतात. एकीनी तर निष्ठा च्या जोडीला भलतच नाव ठेवल्याचे ऐकले.
नावाचा अर्थ समजून न घेताच नावं ठेवली जातात. आकर्षक वाटतात म्हणून नाहीतर वेगळच काही करायचं म्हणून .
माझ्या मोठ्या मुलीच्या वर्गातल्या मुलीचं नाव भ्रांती , तिच्या बहीण भावांची नावं भ्रमंती आणि भ्रमर .
कशाची भ्रांत पडली कुणास ठाऊक ?
रंगाला नावं ठेवण्याचा उद्देश नाही पण जास्तच सावळ्या असलेल्या मुलीचे नाव श्वेता असू नये असं वाटतच नं ?
आश्लेषा नावाचेही तसेच . नक्षत्राचे नाव म्हणून ठेवल्या जाते पण आश्लेषा म्हणजे आलिंगनासाठी आतुर झालेली स्त्री असा काहीसा अर्थ तरुण भारतात स्व. मा.गो. वैद्यांच्या शब्दांच्या अर्था बद्दल च्या सदरात वाचल्याचे आठवते आहे.

     " नावात काय " असं  शेक्सपिअर  म्हणून गेला . पण  ते काही खरं नाही. मी फायनल इयरला असतांना वर्गातल्या एका मुलीचे लग्न ठरले . छान होती ती दिसायला .तिचा होणारा नवरा एक दोनदा तिला काॕलेजमधे घ्यायला पण आला होता . तो पण छान एकदम स्मार्ट . आम्ही तिला चिडवायचो. त्याचं नाव विचारलं की ती लाजून लाल व्हायची . काही केल्या नाव सांगायची नाही . परीक्षा झाली आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या. 

पूर्वी पेपरमधे ” नांदा सौख्यभरे ” या सदरात नवविवाहितांचे फोटो येत. त्यात तिचाही फोटो आला , त्यात तिच्या नवऱ्याचे नाव होते ” माखनलाल ” . आता सांगा कसं सांगणार ती नाव ? मुलींनी चिडवून बेजार केलं असतं .
प्रत्येकाला आपले छानसे नाव असावे असच वाटतं . मुलींना निदान लग्ना नंतर नाव बदलण्याची संधी तरी असते .पण तिथे सुद्धा मनासारखे झाले तर . नाही तर नावडते नाव जन्मभर चिकटते.
काही नावां मुळे विशिष्ट व्यक्तीरेखा डोळ्यासमोर उभी राहते. तिला तडा गेला तर ” नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा ” अशी गत होते.

नावातच सगळं काही असते नाही कां  ?  नाव कोणतेही असले तरी चांगल्या अर्थाने नाव काढावे हीच इच्छा असते सगळ्यांची . 

काय ? वाचतांना तुम्हालाही आठवायला लागलीत नां नावं आणि टोपण नावं . मजा असते आठवणीत . तेंव्हा जुन्या आठवणींना उजाळा द्या आणि मलाही कळवा बरं का !

सौ. अमृता  खोलकुटे 

Leave a Reply