भंडाऱ्यात पक्ष्यांची शिकार करणाऱ्या १४ शिकाऱ्यांना अटक

भंडारा : १ फेब्रुवारी – तीन दिवसांपूर्वी वीज प्रवाहातून झालेल्या व्याघ्र मृत्युची गंभीर दखल घेत भंडारा वन विभागाने आता शिकाऱ्यांविरुद्ध कंबर कसली आहे. लाखांदूर तालुक्यातील रोहणी येथे जंगली पक्ष्यांची शिकार करणाऱ्या १४ शिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रात्रीच्या सुमारास करण्यात आली.
लाखांदूर वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र दिघोरी, नियतक्षेत्र तिरखुरी अंतर्गत रोहणी या गावालगतच्या शेतशिवारात काही शिकारी जंगली पक्ष्यांची शिकार करण्यासाठी आले असल्याची माहिती लाखांदूर वन विभागाला मिळाली. या माहितीवरुन सापळा रचण्यात आला. रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास शिकाऱ्यांनी त्यांच्या दुचाकी रोहणी-पाहुणगाव रस्त्यावर ठेवल्याचे दिसून आले. शिकाऱ्यांनी शिकार केल्यानंतर ते परत दुचाकीजवळ आल्यानंतर वन विभागाच्या पथकाने त्यांना अटक केली.
या कारवाईमध्ये वन विभागाला १४ शिकाऱ्यांना पकडण्यात यश आले आहे. हे सर्व शिकारी धर्मापुरी (टोली) येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील अनुसूची ४ मधील कवड्या (कॉलर डॉव) ४२ जिवंत, ३ मृत, मोठी मैना (सामान्य मैना) २ मृत व लहान मैना (ब्राम्हणी स्टॉलींग) एक मृत हस्तगत करण्यात आले. तसेच शिकारीकरीता वापरण्यात आलेले सर्व साहित्य, नॉयलन जाळी, तीन बांबू, शिकारीकरीता वापरण्यात आलेले ६ दुचाकी व ५ मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत धमार्पुरी टोली येथील आशिष मोरेश्वर शेंडे (२२), खुशाल नथू शेंडे (४0), आशिष सुखदेव मेश्राम, राकेश आनंदराव शेंडे (२४), किशन तुकाराम शेंडे, अरविंद महादेव शेंडे, शरद देविदास शेंडे, दीपक शालिग्राम मेश्राम, सेवक सिताराम शेंडे, अमर शेंडे, गणेश सहादेव शेंडे, प्रदुमन मोरेश्वर शेंडे व अमोल शंकर मेश्राम या आरोपींचा समावेश आहे .
याप्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावीत, निर्वाण, हात्ते, भजे, ढोले, खंडागळे, पाटील, मेश्राम, प्रफुल राऊत, पोलिस पाटील नंदकिशोर मेश्राम व वनमजूर विकास भूते यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

Leave a Reply