भंडारा भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

भंडारा : १ फेब्रुवारी – राज्यात नुकत्याच नगरपंचायत आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्यापूर्वी पासून भंडारा भाजप अंतर्गत होत असलेली गटबाजी अखेर चहाट्यावर आली आहे. भंडारा भाजपमध्ये तीन गट सक्रिय असताना एका गटाने उघडपणे आपल्या होणाऱ्या खच्चीकरणा बाबत जाहीरपणे भाष्य केले आहे. पक्षात होणारी गळचेपी अखेर भाजप माजी आमदार चरण वाघमारे यांनी बोलून दाखवली आहे. येत्या काळात भंडारा भाजपमध्ये राजकीय भुकंप होण्याची शक्यता एकीकडे जाणकार व्यक्त करीत आहेत.भाजप माजी आमदार चरण वाघमारे यांनी वाढत असलेल्या पक्षाअंतर्गत गटबाजीवर नाराजी व्यक्त केल्याने भंडारा जिल्हा परिषद येथे काँग्रेस भाजपच्या चरण वाघमारे गटाची सत्ता येणार अशी चर्चा सुरू आहे.
भंडारा भाजप मध्ये तीन गट
भंडारा भाजप मध्ये तीन गट सक्रिय झाले असून भाजप खासदार सुनील मेंढे, विधान परिषदेचे आमदार परीणय फुके, माजी आमदार चरण वाघमारे यांचे गट सक्रिय आहेत. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार चरण वाघमारे यांचा विधान परिषद सदस्य परीणय फुके यांच्या व्यक्तीगत विरोधामुळे दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर पुन्हा माजी आमदार चरण वाघमारे यांना पक्षात आणून भाजपने आपली चुक सुधारली होती. मात्र,आता भंडाऱ्यात भाजप बलशाली पक्ष बनेल,अशी अपेक्षा असतांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून पुन्हा एकदा गटबाजी सुरू झाली आहे. भाजप खासदार सुनील मेंढे,विधान परिषदेचे आमदार परीणय फुके यांचा गटाद्वारे उघडपणे माजी आमदार चरण वाघमारे यांचा विरोध करणे सुरू झाले आहे. आता माजी आमदार चरण वाघमारे यांनी आपले होणारे खच्चीकरणाबद्दल उघडपने भाष्य केले आहे.
भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेस 21 जागा, भाजपा 12, राष्ट्रवादी 13, इतर 6 अशा जागा निवडून आल्या आहेत. एकंदरीतच जिल्हा परिषद मध्ये बहुमत करीता 27 सदस्य लागतात. मात्र, कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. कॉंग्रेस नेत्यांनी अद्यापही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी कुठलीही बोलणी केली नाही त्यामुळे येणाऱ्या काळात काँगेस बरोबर भाजपा मधील चरण वाघमारे गट सत्ता स्थापन करणार अशी चर्चा रंगू लागली आहे.

Leave a Reply