सध्याची जागतिक स्थिती पाहता भारतासाठी अनेक संधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : ३१ जानेवारी – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदींनी संसद परिसरात माध्यमांशी संवाद साधला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात होत आहे आणि खासदारांसह आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सध्याची जागतिक स्थिती पाहता भारतासाठी अनेक संधी आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
भारताचा आर्थिक विकास आणि भारताने विकसित केलेली लस यामुळे जगात एक विश्वास निर्माण करते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चांचे मुद्दे आणि मोकळ्या मनाने केलेली चर्चा जागतिक संधी निर्माण करू शकते. यामुळे सर्व राजकीय पक्ष आणि सदस्यांनी खुल्या मनाने उत्तम चर्चा करून देशाच्या विकासात आणि प्रगतीला गती देण्यास मदत करतील, अशी अपेक्षा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.
निवडणुकांमुळे सततच्या गदारोळाने संसदेचं अधिवेशन आणि चर्चा विस्कळीत होतात. विधानसभा निवडणुकांमुळे संसदेच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. पण निवडणुका होतच राहतील. आणि हे अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण वर्षभराचं देशाच्या विकासाचं चित्र समोर मांडतं. यामुळे विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन हे अधिवेशन फलदायी होईल यासाठी सहकार्य करावं. देशाच्या आर्थिक विकासाला नवी उंची देण्यासाठी ही एक मोठी संधी आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांना चर्चेत सहभागी होण्याचं आवाहन केलं.

Leave a Reply