मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

मन:शांती – स्वतःवर प्रेम करा….

विचार करत बसले होते, आपसूकच मनात विचार आला, इतके वर्ष झाले आपण कधी आपल्यावरच प्रेम केले का? आपण आपल्याला आवडतो का? आपल्या मनावर आपण प्रेम केले का. प्रेम ही अशी अनुभूती आहे ती आपल्या मनाला असिम असा आनंद देते. आपण किती प्रेम करतो स्वतःवर. प्रेमाला कधी मोजमाप नसतं. आज अचानक हा प्रश्न मनात का आला. मग माझ्या अंतर्मनातून माझाच आवाज मला एकु आला. हो, मी माझ्यावर खूप प्रेम करते. क्षणाचाही विलंब न लावता माझ्या मनाने मला उत्तर दिले. लगेच दुसरा प्रश्न मनात उभा राहिला, अग, प्रेम करते तर स्वतःला इतका त्रास का करून घेते? त्या प्रश्नावर माझे उत्तर, मी का त्रास करून घेऊ, इतर लोक मला त्रास देतात त्याच मी काय करू?
खुप वेळ ह्या प्रश्नाच्या उत्तरावर विचार करत बसली. आपण स्वतः का त्रास करून घेतो. प्रत्येक व्यक्ती स्वतःला आणि बुद्धीला जसे पटेल तसे वागते पण कधी कधी काय होत आपल्याला वाटतं की समोरच्या व्यक्तीने आपल्याला चांगले वाटेल असेच वागावे. ती व्यक्ती तशी नाही वागल्यास त्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो. माझं म्हणणं येवढं की आपल्यासाठी दुसऱ्यांनी का बदलावे. तिला तिचे पण मत असेल ना. आधी आपण स्वतःला बदलायला हवं.
आपण दुसऱ्याशी नेहमी चांगले वागतो. त्यामुळे आपल्या मनाला समाधान मिळत. पण काय होत, त्या व्यक्तीबरोबर एखाद वेळेस काही मतभेद झालेत तर ती व्यक्ती आपल्याला बोलते. त्या वेळेस ती हा विचार नाही करत की, ही व्यक्ती तर माझ्यासोबत नेहमी चांगली वागते. तरीपण आज आपण असे का वागलो. तिला त्याच काही नाही वाटतं. ती फक्त आपला स्वार्थ बघते. ती व्यक्ती बोलून मोकळी होते. पण आपल मन तेच तेच आठवत रहात आपण मनातल्या मनात घुसमटत राहतो. त्याचा त्रास कोणाला होतो आपल्यालाच ना. त्याला साधी कल्पना पण नसेल की, तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेत आहात. पण तुम्ही दुसऱ्याला कोसून स्वतःचा छळ करता आहात.
ह्या सगळ्यात तुम्ही एक गोष्ट विसरून बघा, स्वतःवर प्रेम करा. जर स्वतःवर प्रेम केले तर ह्या गोष्टीकडे तुमचे आपोआप दुर्लक्ष होईल. ह्या गोष्टी तुमच्या मनाला छळणार नाही. तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
स्वतःवर प्रेम केले तर स्वतःच्या आनंदासाठी तुम्ही कोणाशी अबोला धरणार नाही आणि कोणी तुमच्याशी वाईट वागला तर तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार नाही. त्या व्यक्तीचे स्थान तुमच्या आयुष्यात महत्वाचे असेल, तर तुम्ही मैत्रीचा हात पुढे कराल. जर ती व्यक्ती महत्वाची नसेल तर तुम्ही पाठ फिरवून आपल्या मार्गाने जाल.
प्रत्येक वादात स्वतःला हा प्रश्न विचारा, मी समोरच्याचा जेवढा राग करतो तेवढा मी स्वतःवर प्रेम करतो का? स्वतःवर प्रेम करा मग आपोआप तुमच्यात बदल होईल.तुम्हाला आंतरिक मन:शांती मिळेल

पल्लवी उधोजी

Leave a Reply