न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीनंतर पेगॅसस प्रकरणी विरोधक आक्रमक

नवी दिल्ली : ३० जानेवारी – २०१७ सालच्या एका संरक्षण व्यवहाराचा भाग म्हणून भारताने इस्रायलकडून पेगॅसस हे स्पायवेअर खरेदी केल्याचा दावा करणारी बातमी न्यू यॉर्क टाइम्स या दैनिकाने प्रकाशित केल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेस व डाव्या पक्षांनी शनिवारी या अहवालावरून सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने संसदेची फसवणूक केली, सर्वोच्च न्यायालयाला फसवले, लोकशाहीचे अपहरण केले आणि देशद्रोही कृत्य केले असा आरोप करून काँग्रेसने सरकारवर जोरदार टीका केली. पुढील आठवडय़ापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण हा मुद्दा उपस्थित करू आणि संसद सदनात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकार यांच्याकडून उत्तरदायित्वाची मागणी करू, असे पक्षाने सांगितले.
या मुद्दय़ाची स्वत:हून दखल घ्यावी आणि न्यायालयाची ‘हेतुपुरस्सर’ फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सरकारविरुद्ध दंडात्मक कार्यवाही सुरू करावी, असे आवाहन काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाला केले. काँग्रेसने त्याचा हेतू स्पष्ट केल्यामुळे, २०२२ सालच्या अर्थसकल्पीय अधिवेशनावर पेगॅसस मुद्दय़ाचे सावट राहणार आहे. याच मुद्दय़ावर सर्व विरोधी पक्षांनी सभागृहाचे कामकाज बंद पाडल्यामुळे २०२१ सालचे संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशन वाया गेले होते. पेगॅसस स्पायवेअरचा वापर करून विरोधी पक्ष नेते, सशस्त्र दले आणि न्यायपालिका यांचे दूरध्वनी ‘टॅप’ करून सरकारने देशद्रोह केल्याचा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. ‘आमच्या मूलभूत लोकशाही संस्था, राजकीय नेते व जनता यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी मोदी सरकारने पेगॅसस खरेदी केले. सरकारी अधिकारी, विरोधी पक्षनेते, सशस्त्र दले, न्यायपालिका या सर्वाना या फोन टॅिपगद्वारे लक्ष्य करण्यात आले. हा देशद्रोह आहे’, अ्से गांधी यांनी ट्विटरवर लिहिले. मोदी सरकारने संसदेची ‘फसवणूक’ केली आणि सर्वोच्च न्यायालयाला ‘ठकविले’, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुर्जेवाला यांनी पत्रकार परिषदेत केला.
इस्रायलसोबतच्या एका संरक्षण खरेदी व्यवहाराचा भाग म्हणून भारत सरकारने २०१७ साली पेगॅसस स्पायवेअर खरेदी केल्याचा दावा करणारे ‘न्यू यॉर्क टाइम्स’ हे दैनिक ‘सुपारी मीडिया’ असल्याची संभावना केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी शनिवारी केली. ‘‘तुम्ही न्यू यॉर्क टाइम्सवर विश्वास ठेवू शकता काय? ते प्रख्यात ‘सुपारी मीडिया’ आहेत,’’ अशा शब्दांत देशाचे माजी लष्करप्रमुख असलेले केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व नागरी हवाई वाहतूकमंत्री सिंह यांनी या वृत्ताबाबत ट्विटरवर प्रतिक्रिया दिली.
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्ताबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यवे, अशी मागणी डाव्या पक्षांनी शनिवारी केली. या मुद्दय़ावर सरकारचे मौन ही त्याच्या ‘गुन्हेगारी कृत्याची कबुली’ आहे, असेही त्यांनी सांगितले. आपण हे सायबर शस्त्र का खरेदी केले, त्याच्या वापरासाठी परवानगी कुणी दिली, लक्ष्ये कशी निवडण्यात आलीत आणि हे अहवाल कुणाला मिळालेत याबाबत मोदी सरकारने प्रतिज्ञापत्रावर स्पष्टीकरण द्यावे, असे माकपचे सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी ट्विटरवर लिहिले. पेगॅसस स्पायवेअरबाबतची काही तथ्ये सरकार संसदेपासून लपवत होते. आता ती उघढ झाली आहेत. संसदेचे अधिवेशन जवळच असून आता त्यांना याबाबत प्रश्न विचारले जातील. या स्पायवेअरचा वापर कुणावर करण्यात आला याचे सरकारने उत्तर द्यायला हवे, असे भाकपचे सरचिटणीस डी. राजा म्हणाले.

Leave a Reply