करोनाची तिसरी लाट ही मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत संपुष्टात येईल – राजेश टोपे

मुंबई : ३० जानेवारी – देशासह राज्यात करोनाची तिसरी लाट सुरू असून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. राज्यात शनिवारी २७ हजार रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉनचा प्रसार सुरू असतानाच करोनाच्या न्यूकॉन व्हेरियंटची भीती वर्तवण्यात येत आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केलंय. तसेच करोनाची ही लाट कधीपर्यंत संपुष्टात येईल, याबद्दलही त्यांनी पंढरपुरात माहिती दिली.
करोनाची तिसरी लाट ही मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत संपुष्टात येईल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिल्याचं टोपे म्हणाले. करोनाचा न्यूकॉन हा व्हेरिंयट घातक असून त्यासंदर्भात वर्तवण्यात येणाऱ्या भीतीबद्दल बोलताना टोपे म्हणाले, की प्राथमिक माहितीनुसार हा व्हेरियंट धोकायदायक आणि घातक असल्याचं म्हटलं जातंय. परंतु राज्यातील आरोग्य यंत्रणा या विषाणुचा सामना करण्यासाठी सक्षम आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटना त्यावर संशोधन करत आहे. विशेष म्हणजे त्यात मृत्यूदर ३० टक्के आहे असं सांगितलं गेलं आहे. तो ओमायक्रॉनइतकाच वेगाने प्रसार होणारा आहे. पण अद्याप यावर जागतिक आरोग्य संघटना अभ्यास करत आहे. त्याचे कोणतेही बाधित नव्याने कुठे आढळलेले नाहीत. त्यामुळे अद्याप त्यावर काळजी करण्याची आवश्यकता नाही”, असंही टोपे यांनी सांगितलं.
दरम्यान, मास्कमुक्त महाराष्ट्र करण्याविषयी आपण कधीच उल्लेख केला नसल्याचं राजेश टोपे शनिवारी बोलताना म्हणाले होते. “मास्कमुक्त महाराष्ट्र असं आम्ही कधीही म्हटलेलो नाही. इंग्लंड, डेन्मार्क, हॉलंड अशा युरोपातल्या देशांमध्ये काही निर्णय घेतले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्याला त्यातून काही बोध घेता येईल का? आपल्याकडील नियमांबाबत काही बदल करता येतील का? याविषयी आयसीएमआरकडे विचारणा करण्याची विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना केली”, असं स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिलं होतं.

Leave a Reply