संपादकीय संवाद – महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवणारे महाआघाडी सरकार

महाराष्ट्रातील मॉल्स, सुपर मार्केट आणि मोठ्या किराणा दुकानांमध्ये द्राक्षापासून बनविली जाणारी वाईन म्हणून ओळखली जाणारी दारू आता उपलब्ध करून दिली जाणार आहे. अश्या दारूविक्रीला परवानगी देण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे अर्थातच राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दारू हा प्रकार जरी आज समाजमान्य असला, तरी वाईट म्हणूनच समजला जातो. दारूच्या अतिसेवनाने माणसाची प्रकृती तर बिघडतेच आणि त्याचबरोबर अनेक आयुष्ये आणि अनेक परिवार बरबादही होतात. दारू प्रमाणात घेतली तर बारी असते म्हणतात, मात्र पहिला घोट पोटात गेला की पिणारा सर्व प्रमाण विसरतो आणि अतिसेवनाने नशा करून स्वतःची आणि परिवाराची बरबादी ओढवून घेत असतो. नशेत अनेकदा तो नको त्या गोष्टी करतो, काहीवेळा भयानक अपघात किंवा गुन्ह्यांनाही तो आमंत्रण देत असतो.
दारूमध्ये अल्कोहोल हा पदार्थ असतो. वाईन ही द्राक्षापासून बनवली जाते, दारूच्या इतर प्रकारांच्या तुलनेत वाईनमध्ये अल्कोहोल अत्यल्प प्रमाणात असते. त्यामुळे दारूने जसे नुकसान होते, तसे वाईन सेवनाने नुकसान होत नाही, असा दावा दारू समर्थक करतात. मात्र जास्त नसले तरी थोडे नुकसान तर होतेच, आणि थोडे सेवन केले तर थोडे नुकसान होते, एकदा सवय लागली कि थोड्याने होत नाही आणि मग प्रमाण वाढतच जाते, पर्यायाने नुकसानही वाढतेच असते. सर्वसाधारणपणे इतर दारूचे प्रकार खरेदी करण्यासाठी तुम्हाला राज्याच्या अबकारी कर खात्याकडून परमिट घेणे आवश्यक असते, वाईनमध्ये अल्कोहोल कमी असल्यामुळे परमिट आवश्यक नाही.
असे असले तरी आतापर्यंत वाईन ही दारूच्या दुकानातच विकली जात असे, तिथे सर्वसामान्यांना जाणे अनेकदा प्रशस्त वाटत नसे, पोराबाळांनी
जाण्याचा तर प्रश्नच नव्हता. आता मात्र मोठे किराण्याचे दुकान किंवा मॉल मध्ये वाईन मिळणार आहे, त्यामुळे शाळेतली मुलेसुद्धा पॉकेट्मनीतून विकत घेऊन वाईनचे सेवन करू शकतील , अशी भीती व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रात द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, द्राक्ष उत्पादकांच्या पिकाला चांगला भाव मिळावा, आणि महाराष्ट्रातच विकल्या जाणाऱ्या वाईनमुळे राज्य शासनाला करापोटी उत्पन्न व्हावे या कथित उदात्त हेतूने राज्य मंत्रिमंडळाने हा वाईन विक्रीचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. मात्र याचे हे दोन फायदे बाजूला ठेवले तर दुष्परिणाम किती होतील, याचा विचार मुख्यमंत्र्यांनी केलेला दिसत नाही. या निर्णयामुळे किराणा दुकानात जर वाईन मिळू लागली तर लहान मुलेही वाईन विकत घेतील आणि आज जसे शाळकरी मुले गुटखा, खर्रा किंवा सिगारेटचे सेवन करतात, तसेच वाईनचेही सेवन करू लागतील. परिणामी पुढच्या काही पिढ्या मद्याच्या आहारी गेल्या, तर आश्चर्य वाटू नये.
काल सकाळी ख्यातनाम साहित्यिक आणि सामाजिक विचारवंत डॉ. अनिल अवचट यांचे निधन झाले, अनिल अवचट यांनी दारूच्या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी आयुष्य वेचले होते, त्यांच्या मृत्यूच्या दिवशीच राज्य सरकारने वाईन विक्री खुली करण्याचा निर्णय घेतला, हा एक विचित्र योगायोग म्हणावा लागेल.
प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी कष्ट करून कामे करण्याचा अधिकार असतो. तसाच द्राक्ष उत्पादकांनाही आहे. मात्र दुसऱ्याचे आयुष्य बरबाद करून कामे करणे हे कोणत्या नैतिकतेला धरून आहे, याचा विचार व्हायला हवा. स्मशानघाटावर मृत देहांना जाळण्यासाठी लागणारी लाकडे फोडून तिथला लाकूडफोड्या पोट भरत असतो. दररोज चांगली कमाई व्हावी, यासाठी जास्तीत जास्त मृतदेह यावे म्हणून तो इच्छा करत असतो, थोडक्यात आपले पोट भरण्यासाठी तो इतरांचे मरण चिंता असतो, महाराष्ट्र सरकारचा कालचा निर्णय असाच आहे. शेतकऱ्यांचे पोट भरण्यासाठी सरकार भावी पिढ्या बरबाद करायला निघाले आहे.
मात्र यामुळे जनमत क्षुब्ध होणार आहे. आधीच्या सरकारने काही जिल्ह्यांमध्ये दारूबंदी केली होती. दारूविक्रेत्यांचे पोट भरावे, म्हणून या सरकारने ती दारूबंदी उठवली, आता वाईन खुली करून देत, महाआघाडी सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. राज्याला मद्यराष्ट्र करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ती हे सरकार खरी ठरवते आहे की काय असे वाटू लागले आहे. ही खरी ठरली तर जनसामान्य रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, याची जाणीव सरकारने ठेवायला हवी.

अविनाश पाठक

Leave a Reply