प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाल्यानंतर प्रियकर फरार

नागपूर : २५ जानेवारी – प्रेमसंबंधातून अल्पवयीन तरुणीला गर्भधारणा झाल्यानंतर तिचा प्रियकर फरार झाला. गर्भधारणेमुळे आता या अल्पवयीन मुलीचे कसे करावे, असा प्रश्न पालकांना पडला आहे. यशोधरानगर येथील ही पीडित मुलगी १७ वर्षांची असून ११ वीत शिकते. तिचा प्रियकर आरोपी विक्रांत शिवाजी गौरकर (वय २३) मूळचा भंडारा येथील रहिवासी आहे. काही काळ तो शांतीनगरात राहायचा. त्याचे दोन वर्षांपासून या मुलीशी प्रेमसंबंध असून, या दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेत वारंवार शरीरसंबंध जोडल्याने तिला गर्भधारणा झाली. काही दिवसांपूर्वी पोट दुखत असल्याने पालकांनी तिला डॉक्टरकडे नेल्याने ती गर्भवती असल्याचा खुलासा झाला. त्यामुळे प्रकरण यशोधरानगर पोलिसांकडे पोहोचले. पोलिसांनी आरोपी विक्रांतविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करताच तो फरार झाला. पोलिसांनी हे प्रकरण महिला तसेच बालकल्याण समितीकडे नेले. पोलिस आणि महिला व बालकल्याण समितीने आता मुलीचा गर्भपात करण्यासाठी न्यायालयातून परवानगी मिळावी म्हणून कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

Leave a Reply