दिल्लीतील सरकारी कार्यालयांमध्ये आता बाबासाहेब आंबेडकर व भगतसिंग यांचे फोटो लागणार

नवी दिल्ली : २५ जानेवारी – प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी एक मोठी घोषणा केली. सरकारी कार्यालयांमध्ये आता बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो लागणार, असं केजरीवाल यांनी यावेळी सांगितलं.
दिल्लीच्या सरकारी कार्यालयांमध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो लावण्याच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, दिल्लीतल्या सगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये इथून पुढे नेते आणि मुख्यमंत्र्यांचे फोटो लावले जाणार नाही. सगळ्या कार्यालयांमध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांचेच फोटो लावले जातील.
या कार्यक्रमामध्ये बोलताना अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतल्या करोना परिस्थितीवरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून जग आणि देश करोना महामारीशी लढा देत आहे. देशात आत्ता तिसरी लाट सुरू असतील तरी दिल्लीमध्ये ही पाचवी लाट आहे. करोनाचा सर्वाधिक फटका हा दिल्लीला बसला आहे. त्यामुळे दिल्लीतल्या नागरिकांनी करोना प्रतिबंधाच्या नियमांचं पालन करावं, जेणेकरून आपल्याला निर्बंध शिथिल करता येतील.

Leave a Reply