गोवंशाची तस्करी करणारे पिकअप वाहन उलटून दोन गाईंचा मृत्यू

भंडारा : २५ जानेवारी – भरधाव ट्रेलरला ओव्हरटेक करतांना गुरांची तस्करी करतांना पिकअप वाहन उलटले. यात दोन गाईंचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक व वाहक पसार झाले. अपघात मध्यरात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील मांगली शिवारात घडला.
मध्यरात्रीच्या सुमारास तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील मांगली शिवारात गुरांची तस्करी करणारा पिकअप वाहन क्रमांक एम.एच.३५ ए.जे.२२८८ ट्रेलर क्रमांक एम.एच.४0 वाय.९२७७ ला ओव्हरटेक करतांना पिकअपचा मागील भाग ट्रेलरला घासला गेला. त्यामुळे वाहन अनियंत्रित होऊन उलटले. त्यात वाहनातील दोन गाईंचा घटनास्थळीच मृत्यू झाला. इतर ९ गाई सुदैवाने बचावल्या. पिकअप वाहन हे गोंदियाहून नागपूर येथील कत्तलखान्याकडे जात असल्याची माहिती आहे.
देव्हाडी पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वाहन जप्त केले. उर्वरित गाईंना पिंपळगाव गोरक्षण केंद्रात पाठविण्यात आले. तपास पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात देव्हाडी पोलिस केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक तुकाराम गभने, पोलिस शिपाई धानेश्वर खराबे, सुधीर धमगाये, ढबाले करीत आहे.
मध्यप्रदेश व गोंदिया जिल्ह्यातून गुरांची तस्करी मोठय़ा प्रमाणात सुरु असून पोलिसांपासून बचावाकरिता वाहने रात्रीला भरधाव जातात. त्यांच्यावर आळा घालण्याची गरज आहे.

Leave a Reply