संपादकीय संवाद – राष्ट्रीय वाटचालीसाठी शिवसेनेला शुभेच्छा द्यायलाच हव्या

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवपंत ठाकरे यांनी काल शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांना सासम्बोधीत करतांना दिल्लीची सत्ता काबीज करण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीवर भगवा फडकविण्याचे स्वप्न स्वर्गीय बाळासाहेबांनी पहिले होते, त्यामुळे ते स्वप्न पूर्ण करायचेच आहे, असे त्यांनी ठणकावले आहे.
कुणीही मोठी स्वप्ने बघण्यात काहीही गैर नाही. लहान लक्ष्य ठेवणे हा गुन्हा आहे, मात्र मोठी स्वप्न बघण्यात काहीही चूक नाही, अश्या आशयाचे एक इंग्रजी बोधवचन वाचं आहे, त्यामुळे दिल्लीची सत्ता काबीज करण्याचे स्वप्न बघण्याचा शिवसेनेला पूर्ण अधिकार आहे. मात्र कोणतेही स्वप्न बघतांना ते लक्ष्य गाठण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन गरजेचे असते. हे नियोजन करतांना आज आपण कुठे आहोत, याचे भान ठेवणेही आवश्य असते. दिल्लीवर हल्लाबोल करू बघणारी शिवसेना आज नेमकी कुठे आहे. तेच आपल्याला बघायचे आहे.
शिवसेना हा पक्ष मुळी मुंबई शहरासाठी एक संघटना म्हणून उभा राहिला होता,मुंबईत मराठी माणसावर होणार अन्याय आणि त्याची होणारी गळचेपी यासाठी १९६६ साली शिवसेनेचे गठन झाले होते. हळूहळू शिवसेना वाढली, आज ५५ वर्षानंतर शिवसेना आजच्या परिस्थितीत आलेली आहे.
आज ५५ वर्षानंतर तरी शिवसेना संपूर्ण महाराष्टात पोहोचली आहे काय? आणि महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापन करू शकते काय? याचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल. आज महाराष्ट्राच्या काही भागात शिवसेनेचा जोर आहे. उर्वरित भागात शिवसेना औषधालाही सापडत नाही. १९९० पर्यंत मुंबई आणि कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात शिवसेना कुठेही नव्हती. भाजपशी युती केल्यावर उर्वरित महाराष्ट्रात शिवसेनेचे अस्तित्व दिसु लागले आहे. या वाटचालीत शिवसेना विधानसभेत ८० जागांच्या वर गेली नाही. आणि आज शिवसेनेचे फक्त ५६ आमदार विधानसभेत आहेत. लोकससभेत कधीही २० च्या वर शिवसेना गेलेली नाही. अश्या स्थितीत ५४२ लोकसभा सदस्य असलेल्या संसदेत शिवसेना भगवा कसा फडकवेल याचा उद्धवपंतांनी विचार करायला हवा.
आज महाराष्ट्र वगळता कुठेही शिवसेनेचे अस्तित्व नाही. सम्पुर्ण देशात सर्व राज्यांमध्ये शिवसेनेला आपले अस्तित्व निर्माण करावे लागेल. त्यासाठी प्रादेशिकवाद सोडावा लागेल आणि व्यापक राष्ट्रीय धोरण शिवसेनेला स्वीकारावे लागेल. राज्याराज्यातील समस्या समजावून घेत त्यांना आपले अस्तित्व निर्माण करावे लागेल. मराठी माणूस आणि नंतर हिंदुत्व डोळ्यासमोर ठेऊन राजकारण करणाऱ्या शिवसेनेला हे जमेल काय? याचा विचार व्हायला हवा. तरीही शिवसेनेने स्वप्न बघितले आहे, त्यासाठी पंचानामाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा.

अविनाश पाठक

Leave a Reply