भाजपाने ज्या पक्षासोबत हातमिळवणी केली, त्याला संपवण्याचा प्रयत्न केला – नवाब मलिक

मुंबई : २४ जानेवारी – मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल भाजपावर हल्लाबोल केला. ते दृकश्राव्य माध्यमातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेची २५ वर्षे युतीत सडली या वक्तव्याचाही पुनरुच्चार केला. त्यांच्या या मताशी सहमत असल्याचं आज नवाब मलिक यांनी सांगितलं.
आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांनी आपलं मत मांडलं आहे. ते म्हणाले, “ज्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, भाजपासोबत युतीत असताना शिवसेनेची २५ वर्षे सडली. हे खरं आहे. देशात भाजपाने ज्या पक्षासोबत हातमिळवणी केली, त्याला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटतं ह्यामुळेच अनेक दिवसांपासून ते काहीतरी वेगळं करण्याच्या विचारात होते आणि २०१९ सालचे निवडणुकांचे निकाल पाहून त्यांनी निर्णय घेतला. मला वाटतं आता शिवसेनेचा विस्तार होईल”.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी भाजपावर हल्ला चढवला. वापरायचं आणि फेकून द्यायचं हीच भाजपाची नीती आहे असं विधानही त्यांनी केलं. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “जे विरोधक माझ्या तब्येतीची काळजी घेत आहेत त्या काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचं तेज दाखवणार आहे. जसं काळजीवाहू सरकार असतं, तसे हे काळजीवाहू विरोधक आहेत. त्यांचा स्वतःच स्वतःच्या काळजीने अंत होणार आहे. त्यामुळे त्यांची चिंता करण्याची गरज नाही. हे काळजीवाहू विरोधक कोणे एकेकाळी आपले मित्र होते. हे नाही म्हटलं तरी आपलं दुःख आहे. याचं कारण आपण त्यांना पोसलं. मी गोरेगावच्या शिबिरात म्हटलो होतो की आपली २५ वर्षे युतीत सडली. तीच माझी भूमिका आणि मत आजही कायम आहे. मी त्या मतावर ठाम आहे”.

Leave a Reply