आम्ही हिंदुत्वापासून कधीही दूर जाऊ शकत नाही, भाजपाला राजकारणाचं गजकरण झालंय – उद्धव ठाकरे

मुंबई : २४ जानेवारी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केलाय. भाजपाला राजकारणाचं गजकरण झालंय, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. तसेच वाघाचं कातडं पांघरलेलं गाढव किंवा शेळी असते, तसं भाजपानं हिंदुत्वाचं कातडं पांघरलं आहे, असाही हल्ला ठाकरेंनी चढवला. ते रविवारी दृकश्राव्य माध्यमातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधताना बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेना प्रमुख पूर्वी राजकारण म्हणजे गजकरण आहे असं म्हणायचे. जेवढं खाजवावं तेवढी अधिक खाज येते. तसे या सर्वांना राजकारणाचं गजकरण झालंय. ते राजकारण म्हणून आता काहीही खाजवत आहेत. आपण यांच्यापासून का दुरावलो, तर त्यावेळी शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दिशा दाखवली. हिंदुत्वासाठी सत्ता की सत्तेसाठी हिंदुत्व हा एक प्रश्न आहे. आज यांचं हिंदुत्व सत्तेसाठी अंगिकारलेलं एक ढोंग आहे. वाघाचं कातडं पांघरलेलं गाढव किंवा शेळी असते तसं यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलं आहे.”
“भाजपाला २५ वर्षे पोसल्यानंतर आत्ता हे आपल्या लक्षात आलं. हे दुर्दैव आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही. आम्ही हिंदुत्वापासून कधीही दूर जाऊ शकत नाही. मी अयोध्येतही हेच सांगितलं होतं. आम्ही भाजपाला सोडलंय, हिंदुत्वाला सोडलेलं नाही. भाजपा म्हणजे हिंदुत्व नाही. मध्यंतरी अमित शाह पुण्यात येऊन गेले आणि हिंमत असेल तर एकटे लढून दाखवा असं म्हटले. मी दसऱ्याच्या मेळाव्यात हे आव्हान स्विकारलं आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, “वापरायचं आणि फेकून द्यायचं हीच भाजपाची नीती आहे. जेव्हा यांचं डिपॉझिट जप्त होतं, तेही दिवस आठवा. तेव्हा यांनी प्रादेशिक पक्षाशी युती केली. शिवसेना, अकाली दलाशी युती केली. ममता बॅनर्जी यांच्यासोबत युती केली. समता-ममता-जय ललिता असे सगळे पक्ष सोबत घेऊन अटल बिहारी वाजपेयी यांनी सरकार चालवलं होतं. आपण एक दिलाने साथ दिली. काहीही करा पण भगवा फडकलाय तो उतरू देऊ नका अशी आपली भूमिका होती. हे नवहिंदुत्ववादी हिंदुत्वाचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहेत.”
“जे विरोधक माझ्या तब्येतीची काळजी घेत आहेत त्या काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचं तेज दाखवणार आहे. जसं काळजीवाहू सरकार असतं, तसे हे काळजीवाहू विरोधक आहेत. त्यांचा स्वतःच स्वतःच्या काळजीने अंत होणार आहे. त्यामुळे त्यांची चिंता करण्याची गरज नाही. हे काळजीवाहू विरोधक कोणे एकेकाळी आपले मित्र होते. हे नाही म्हटलं तरी आपलं दुःख आहे. याचं कारण आपण त्यांना पोसलं. मी गोरेगावच्या शिबिरात म्हटलो होतो की आपली २५ वर्षे युतीत सडली. तिच माझी भूमिका आणि मत आजही कायम आहे. मी त्या मतावर ठाम आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Leave a Reply