पुतळा उभारल्याने तुमची जबाबदारी संपत नाही – ममता बॅनर्जींने पंतप्रधानांना ठणकावले

कोलकाता : २३ जानेवारी – दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. दरम्यान, आमच्या सरकारने निर्माण केलेल्या दबावामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा दिल्लीतील इंडिया गेटवर उभारला जात आहे, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी केला. “आमच्या दबावामुळे हा पुतळा उभारला जात आहे. परंतु पुतळा उभारल्याने तुमची जबाबदारी संपत नाही,” असे ममता बॅनर्जी केंद्र सरकारला म्हणाल्या.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले की, प्रत्येक भारतीयाला त्यांच्या देशासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा अभिमान आहे. पंतप्रधान मोदींनीही लोकांना ‘पराक्रम दिवसा’च्या शुभेच्छा दिल्या. आझाद हिंद फौजेचे संस्थापक बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी करण्याची घोषणा सरकारने केली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आणि हा दिवस राज्यभर ‘देश नायक दिन’ म्हणून साजरा केला जाईल, असे सांगितले.
“देशनायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. राष्ट्रीय आणि जागतिक प्रतीक, बंगालमधून नेताजींचा उदय भारतीय इतिहासात अतुलनीय आहे,” असे त्या ट्वीटमध्ये म्हणाल्या.
यावेळी ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला नेताजींचा वाढदिवस देश नायक दिन म्हणून साजरा करण्यासाठी राष्ट्रीय सुट्टी घोषित करण्यात यावी, असे आवाहन केले.

Leave a Reply