आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी आघाडी होऊ शकली नसती – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : २३ जानेवारी – शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. त्यानिमित्त राज्यभरात सर्वपक्षीय नेत्यांकडून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. त्याचबरोबर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्नही केला. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी आघाडी होऊ शकली नसती, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली आहे.
त्याचबरोबर ‘ज्या आघाडीला सुरुवातीला महाशिव आघाडी असं नामकरण केलं जाणार होतं, त्याऐवजी शिव या शब्दाला ज्यांनी विरोध केला, त्यांच्यासोबत बाळासाहेब कधीच गेले नसते. विचाराच्या आधारावर एक राजकीय पक्ष निर्माण झाला होता. काँग्रेससोबत जाण्याऐवजी मी शिवसेना बंद करेल, मी पक्ष विसर्जित करेल इतकी तिखट भूमिका ठाकरे यांची होती. भाजप आणि शिवसेनेच्या विचारात सामर्थ्य होतं. सत्तेसाठी हे दोन्ही पक्ष कधी एकत्र आले नव्हते’, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
राजकारणातील मॉडल्स गेल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रं काढणं थांबवलं होतं. त्यानंतर सोनिया गांधी, नरसिंह राव आणि सीताराम केसरी हे राजकीय पटलावर आले. त्यावेळी व्यंगचित्रासाठीची ही मॉडेल्स मी मिस केली असं बाळासाहेब म्हणायचे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. अमित शहा आहेत. देवेंद्र फडणवीस आहेत… बाळासाहेब असते तर यांच्यावर त्यांनी हातात कुंचला घेऊन नक्कीच फटकारे लगावले असते, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय.
आजची शिवसेना वेगळी आहे, बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येते. त्यावर बोलताना शिवसेना वेगळी कशी असेल? आजही बाळासाहेबांची प्रेरणा हाच आमचा ऊर्जा स्त्रोत आहे. पिढी बदलते त्यानुसार संघर्षाची प्रतिकं बदलतात. पण विचार तोच राहतो. बाळासाहेबांची शिवसेना ही बाळासाहेबांचीच राहणार. ती दुसऱ्या कुणाचीच होऊ शकत नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

Leave a Reply