नाना पटोलेंच्या अटकेसाठी आंदोलन करणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंवर गुन्हा दाखल

नागपूर : २१ जानेवारी – मोदींना मारण्याची भाषा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. त्यानंतर भाजपनं ठिकठिकाणी आंदोलनं केलीत. विधान परिषदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. त्यावेळी तिथं गर्दी होती. बावनकुळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोविड नियमांचे पालन केले नाही. असा ठपका ठेवत प्रशासनाने बावनकुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळं प्रशासनाच्या विरोधात भाजपचा रोष वाढला आहे. एकीकडं आमदार कृष्णा खोपडे यांना पॉझिटिव्ह असताना आंदोलनात कसे सहभागी झाले. याचे स्पष्टीकरण मागण्यात आले. महापालिकेने खोपडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तर दुसरीकडं बावनकुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून भाजपची मुस्कटदाबी सुरू केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी कोराडी पोलीस ठाण्यासमोर गर्दी जमवली. कोविड मार्गदर्शन सूचनांचे उल्लंघन केले. त्यामुळे बावनकुळे यांच्यावर कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी बावनकुळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले होते. आता न्यायालयीन लढाई लढणार असल्याचा इशारा बावनकुळे यांनी दिला होता.
नाना पटोले यांनी भंडाऱ्यातील जेवणाळा येथे मोदींना मी मारू शकतो, मी शिव्या देऊ शकतो असे कार्यकर्त्यांसोबत बोलताना म्हटले. तो व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर मोदी म्हणजे नरेंद्र मोदी नव्हे, तर तो गावगुंड मोदी असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. पण, भाजपनं नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, यासाठी राज्यभर आक्रमक भूमिका घेतली. ठिकठिकाणी आंदोलनं केली. ग्रामीण भागातील कुहीसह विविध पोलिस ठाण्यांमध्ये त्यांनी तक्रारी दाखल केल्या. कोराडी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक झाले होते.

Leave a Reply