ती फक्त भूमिका वैयक्तिक आयुष्यात मी महात्मा गांधी यांना मानणारा व्यक्ती – अमोल कोल्हे यांचे स्पष्टीकरण

मुंबई : २१ जानेवारी – व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटामुळे सध्या राज्याचं राजकारण आणि समाजकारण ढवळून निघालंय. त्याला कारण ठरलंय, राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी साकरलेली नथुराम गोडसेची भूमिका. हा चित्रपट त्यांनी का स्विकारला, नथुराम गोडसेबद्दल अमोल कोल्हे यांचं मत काय, महात्मा गांधी यांच्याबद्दल अमोल कोल्हेंना काय वाटतं अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अमोल कोल्हे यांनी काही वेळापूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहेत.
‘तो काळ असा होता जेव्हा मी कलाकार म्हणून स्वत: ला सिद्ध करत होतो. वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका करत होतो. हिंदी चित्रपटासाठी ही भूमिका माझ्यासमोर आली. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, ‘ही माझ्या वैचारिक भूमिकेच्या विरोधातली भूमिका आहे. मी या भूमिकेचं कुठेही समर्थन करत नाही.’ त्यावेळी मला सांगण्यात आलं की, ‘कोर्टामध्ये-चौकशी आयोगासमोर नथुरामने जे स्टेटमेंट दिलंय तेच स्टेटमेंट तुम्हाला या भूमिकेच्या माध्यमातून मांडायचं आहे.’ पब्लिक डोमेनमध्ये असलेली गोष्टच जर मला सगळ्यांसमोर मांडायची आहे, तर तेव्हा मला खरोखर असं त्यावेळी वाटलं नाही की मी त्या विचारधारेचं उदात्तीकरण करतोय.’
‘मी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्हतो तेव्हा २०१७ मध्ये या सिनेमाचं चित्रीकरण झालं. त्यावेळी मला कधी स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं की पुढे २०१९ ला मी राष्ट्रवादीत जाईल आणि शिरूरमधून मी लोकसभा निवडणूक लढवेन आणि जनताही मला निवडून देईल. त्यामुळे मी तेव्हा केलेल्या भूमिकेचा राष्ट्रवादी पक्षाशी संबंध जोडू नये’, असं अमोल कोल्हे म्हणाले.
नथुराम गोडसे ही फक्त माझी त्या सिनेमातली भूमिका आहे. वैयक्तिक आयुष्यात गोडसेच्या कृतीचं किंवा त्या विचारांचं मी समर्थन करत नाही. मी महात्मा गांधी यांना मानणारा व्यक्ती आहे, असं म्हणत ती फक्त आपली चित्रपटातली भूमिका असल्याचं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना अमोल कोल्हे यांची बाजू घेतली. तसेच सिनेमातील भूमिका आणि व्यक्तिगत आयुष्य यात फरक असल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं. गांधीवरील सिनेमा अमेरिकेतून प्रदर्शित झाला. गांधी सिनेमा जगात गाजला. त्यामुळे जगात गांधींना महत्त्व आलं. त्या सिनेमात कुणीतरी गोडसेची भूमिका केली. ती भूमिका करणारा आर्टिस्ट होता. नथुराम गोडसे नव्हता. कोणत्याही सिनेमात आर्टिस्ट एखादी भूमिका करत असेल तर त्याकडे आर्टिस्ट म्हणून पाहिलं पाहिजे. शिवाजी महाराज आणि औरंगजेब संघर्ष झाला. शिवाजी महाराजांच्या सिनेमात जर कुणी शिवाजी महाराजांची भूमिका घेत असेल आणि कुणी औरंगजेबाची भूमिका करत असेल तर औरंगजेबाची भूमिका करतो म्हणून तो मोगल साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही. तो कलावंत म्हणून भूमिका करत असतो. किंवा रामराज्यातील सिनेमा असेल तर राम रावणाचा संघर्ष असेल रावणाची भूमिका करणारा व्यक्ती रावण असू शकत नाही. तो कलाकार असतो. सीतेचं अपहरण दाखवलं म्हणजे त्या कलाकाराने अपहरण केलं असं होत नाही. रावणाचा तो इतिहास या माध्यमातून दाखवला जातो, असं सांगतानाच अमोल कोल्हेंनी भूमिका साकारली असेल तर ती कलावंत म्हणून केली आहे. त्याकडे कलाकार म्हणूनच पाहिलं पाहिजे, असं पवार म्हणाले.

Leave a Reply