घ्या समजून राजे हो… – राष्ट्रवादीसोबत राहण्यातला धोका शिवसेनेने ओळखणे गरजेचे

महाराष्ट्रातील बहुचर्चित नगरपंचायत निवडणूकांची मतमोजणीही आटोपली असून त्यात राज्यातील चारही प्रमुख पक्षांना आज मतदारांच्या मनात त्यांचे स्थान कुठे आहे हे स्पष्ट झालेले आहे. अपेक्षेनुसार भारतीय जनता पक्ष हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. भाजपने विधानसभा निवडणूकीतील क्रमांक एक वर राहण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये दुसर्‍या क्रमांकावर असलेली शिवसेना एकदम चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. त्यावेळी तिसर्‍या क्रमांकावर असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आता दुसर्‍या क्रमांकावर आली आहे. तर चौथ्या क्रमांकावरची काँग्रेस आता तिसर्‍या क्रमांकावर आली आहे. हे बघता हे निकाल शिवसेनेसाठी खर्‍या अर्थाने धोक्याचा इशारा देणारे ठरले आहेत असे म्हणता येते.
या सर्व तोडजोडीत राष्ट्रवादी काँग्रेसला स्वबळावर सर्वात जास्त नगरपंचायतींमध्ये आपली सत्ता आणता आली आहे. इथेही भाजप दुसर्‍या क्रमांकावर आहे. अर्थात आधी जरी वेगवेगळे लढले असतील तरी निवडणूकीनंतर एकत्र येऊन जास्तीत जास्त नगरपंचायतीत महाआघाडीची सत्ता आणता येईल आणि आम्ही जिंकलो अशी शेखीही महाआघाडीच्या नेत्यांना मिरवता येईल. मात्र केवळ मतदारांना भ्रमित करण्यासाठी केलेल्या वक्त्यांपलीकडे जाऊन या निकालाचे वस्तुनिष्ठ विश्‍लेषण सर्वच पक्षांनी करणे आवश्यक आहे.
2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेने एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवली होती. यावेळी दोन्ही पक्षांना मिळून राज्यात 200 च्या वर जागा मिळतील अशी आशा होती. मात्र काही जागा कमी पडल्या. त्यात भाजप 105 वरच अडला. याचा फायदा घेत शिवसेनेने बाळासाहेबांच्या खोलीत दिलेल्या कथित आश्‍वासनाची कपोलकल्पित कथा पुढे करुन भाजपला खिंडीत गाठण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यासमोर जाळे फेकले. या जाळ्यात शिवसेना अलगद फसली आणि पुढे काय झाले हा इतिहास ताजा आहे.
त्यावेळी आम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा हा उद्धवपंतांचा हट्ट होता. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेची ही दुखरी नस ओळखली. पाच वर्ष सत्तेपासून दूर राहिल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आणि नेते अस्वस्थ होते. त्यामुळे त्यांना नवे टॉनिक देण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीने हा प्रयोग हाती घेतला. त्यांच्या समवेत काँग्रेसचे कार्यकर्तेही दुखावलेलेच होते. त्यांनाही कुंजारात राष्ट्रवादीने सोबत घेतले. यात परस्परांविरोधात लढलेले तीन पक्ष एकत्र आले आणि अनैसर्गिक गटबंधनाचे सरकार महाराष्ट्रात सत्तारुढ झाले.
हे सरकार सत्तारुढ करताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यातही शरद पवार याचांच वरचष्मा होता. त्यांनी उद्धवपंतांना आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद देतो आहे आता बाकी आम्हाला ठरवू द्या असे सांगून सर्व सुत्रे आपल्या हाती घेतली. या प्रकारात प्रशासनतली सर्व मलाईदार खाती राष्ट्रवादीने आपल्याकडे घेतली. नंतर काही काँग्रेसकडे गेली आणि उर्वरित गाळ शिवसेनेच्या वाट्याला आला. या मंत्रीमंडळात मुख्यमंत्री जरी शिवसेनेचा असला तरी शिवसेनेला बाकी प्रतिनिधीत्व यथातथाच होते. त्यातही निवडणूकीच्या आधी इतर पक्षातून आयात केलेल्या उपर्‍या शिवसैनिकांना झुकते माप देण्यात आले होते. जे खरे निष्ठावंत शिवसैनिक होते. त्यांच्या हातात धुपाटणेच आले होते.
नंतरच्या गेल्या 26 महिन्यातला महाआघाडी सरकारचा कारभार बघता संपूर्ण कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व राहिलेले दिसून येते. याचा फायदा सेनाविरोधकांनी घेतला नसता तरच नवल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी कांँग्रेस या दोन्ही पक्षांशी आधी शिवसेनेचे सरळ शत्रूत्व होते. त्याला महत्त्वाचे कारण म्हणजे या तीनही पक्षांच्या भिन्न विचारधारा, त्यातही शिवसेनेने ज्या हिंदुत्वाचा पुरस्कार केला त्या हिंदुत्वाशी शरद पवारांनी आयुष्यभर उभा दावा मांडला होता. तरीही कथित किमान समान कार्यक्रमाच्या नावाखाली हा कारभार सुरु झाला. हा कारभार करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या हिंदुत्ववादी तत्त्वांना वेळोवेळी मूठमाती कशी द्यावी लागेल याची पद्धतशीर काळजी घेतली. त्यांच्या या प्रयत्नांना काँग्रेसनेही वेळोवेळी हातभार लावला. यामुळे की काय शिवसेनेचा समर्थक असलेला मोठा हिंदुत्ववादी वर्ग दुखावला आहे. त्याचबरोबर पहिल्या फळीतील अनेक शिवसैनिकही नाराज आहेत.
ज्यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रवादी कांँग्रेससोबत शिवसेना महाआघाडी करणार हे जाहीर झाले त्यावेळी शरद पवारांचा हा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे असा निष्कर्ष काही राजकीय विश्‍लेषकांनी काढला होता. आज महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला काही मोजके मतदारसंघ सोडल्यास फारसे अस्तित्व नाही. ते अस्तित्व निर्माण करण्यासाठी इतर पक्षांना नेस्तानाबुत करत आपल्यासाठी जागा निर्माण करणे गरजेचे आहे हे राष्ट्रवादी काँग्रेसने ताडले होते. अशावेळी शिवसेना हे त्यांच्या दृष्टीने सॉफ्ट टार्गेट होते. भाजपचे तगडे नेटवर्क बघता भाजपला ताबडतोब हात लावणे कठीण होते. काँग्रेस जरी आज माघारली असली तरी ग्रामीण भागात काँग्रेसची रुजलेली पाळेमुळे बघता कांँग्रेसलाही ताबडतोब अंगावर घ्यायचे नाही असेच राष्ट्रवादी काँग्रेसने ठरविले असावे. त्यामुळे महाआघाडीचा प्रयोग करुन राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या खच्चीकरणाची अप्रत्यक्ष मुहूर्तमेढ रोवली असे काही अभ्यासक आणि विश्‍लेषक त्यावेळी प्रतिपादन करत होते. त्यावेळी कोणी हे प्रतिपादन फारसे गांभिर्याने घेतले नव्हते.
आज मात्र त्यावेळचे निष्कर्ष खरे ठरु शकतील असे चित्र निर्माण झाले आहे. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत एका काळात राज्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला चौथ्या क्रमांकावर फेकले आहे. त्याचसोबत शिवसेनेचे दुसर्‍या क्रमांकावरील सध्याचे स्थान राष्ट्रवादी कांँग्रेसने आपल्याकडे ओढवून घेतले आहे. शिवसेनेच्या दृष्टीने ही खरी चिंतेची बाब आहे.
राजकारणात प्रत्येकाला वर चढायचे असते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसलाही किमान महाराष्ट्रात तरी सर्वोच्च स्थानावर कसे जाता येईल हा प्रयत्न करायचा आहे. तो प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने करते आहे. त्यात वावगे काहीही नाही. हा प्रयत्न करताना कोणाची तरी मदत घ्यावी लागते आणि कोणाच्या तरी खांद्यावर उभे राहावे लागते. इथे आज राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या खांद्यावर उभी झाली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आपला फायदा करुन घेतो आहे. हवे ते सर्व हातात पडले आणि आपली उच्चस्थानावरील लक्ष्य गाठता आले की राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांच्या खांद्यावर उभे राहून वर चढले त्या शिवेसेनेला लाथ मारायलाही मागेपुढे पाहणार नाही. शरद पवारांचा हा इतिहास जगजाहीर आहे. त्यामुळे हा धोका आतातरी शिवसेनेने ओळखायला हवा आणि मुर्ख्यांच्या नंदनवनातून बाहेर यायला हवे.
आपल्या आयुष्यात आपण जसे करतो तसेच भरावे लागते असे म्हटले जाते. हा न्याय शिवसेनेच्या बाबतीही लावता येऊ शकतो. 1987-88 साली महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेना कुठेही नव्हती. त्यावेळी विधानसभेत आणि संपूर्ण राज्यात अस्तित्व असलेल्या भारतीय जनता पक्षाशी शिवसेनेने युती केली. आम्ही मोठे भाऊ अशी शेखी मिरवत त्यांनी भाजपच्या मदतीने पुढे जाताना आपल्या पोळीवर जास्तीत जास्त तूप कसे ओढता येईल हाच प्रयत्न केला. 2014 मध्ये ऐन निवडणूकीच्या तोंडावर भाजपपासून शिवसेना वेगळी झाली. त्यानंतर सत्तेसाठी पुन्हा एकत्र आले. 2019 मध्ये एकत्र निवडणूका लढवून 56 जागा जिंकल्यावर त्यांनी भाजपला लाथ मारायलाही मागेपुढे पाहिले नाही. वस्तुतः त्यांनी या निवडणूका पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर लढवल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या नावाचा तुम्ही काही ना काही फायदा घेतला होता. तो फायदा मिळताच संधी बघून शिवसेनेने ज्यांच्या मदतीने मोठे झालो त्या भाजपलाच लाथ घातली. हा इतिहास ताजा आहे.
आज राष्ट्रवादीने दुसरी जागा घेत शिवसेनेला चौथ्या जागेवर फेकणे ही देखील इतिहासाची पुनर्रावृत्ती म्हणावी लागेल. शिवसेनेने जे केले ते त्यांच्यावरच उलटले आहे आणि त्या पापाची किंमत त्यांना भविष्यातही चुकवावी लागू शकते.
हे सर्व मुद्दे लक्षात घेता शिवसेनेने वेळीच शहाणे होण्याची गरज निर्माण झाली आहे. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ या न्यायाने आज राष्ट्रवादी काँग्रेससोबत जावून शिवसेना दुसर्‍या स्थानावरुन चौथ्या स्थानावर फेकली गेली आहे. असे असले तरी थोडे फार का होईना पण शिवसेनेचे अस्तित्व दिसते आहे. मात्र असेच चालू राहिले तर शिवसेनेची हळूहळू उतरती भाजणी सुरु होईल आणि ते शिवसेनेसाठी खर्‍या अर्थाने धोकादायक ठरेल.

तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो….

ता.क. : घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.

अविनाश पाठक

Leave a Reply