साताऱ्यात माजी सरपंचाने केली गर्भवती महिला वनकर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल, पर्यावरणमंत्र्यांनी घेतली दखल

सातारा : २० जानेवारी – साताऱ्यात माजी सरपंचाने वनरक्षक महिला कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धदक्कादायक घटना घडली आहे. पळसवडे येथे ही घटना घडली असून मारहाण झालेली महिला कर्मचारी तीन महिन्यांची गर्भवती आहे. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत होता. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी आपल्या पत्नीसोबत महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. सिंधू सानप आणि सूर्याजी ठोंबरे गस्त घालण्यासाठी आले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. व्हायरल झालेल्या व्हिडीओत दांपत्य सिंधू सानप यांना अमानुषपणे मारहाण करत असल्याचं दिसत आहे.
घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होऊ लागला होता. यानंतर सरपंचाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी सरपंच आणि त्यांच्या पत्नीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “पळसवडे गावात महिला वनरक्षक सिंधू सानप आपल्या पतीसोबत जेदेखील वनरक्षक आहेत त्यांच्यासोबत कर्तव्य बजावत असताना सरपंच व वनसमितीचे अध्यक्ष रामचंद्र जानकर आणि त्यांच्या पत्नीने मारहाण केल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथकं तयार करण्यात आली होती”.
सूर्याजी ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “गस्त घालण्यासाठी गेलो असता सरपंचाच्या पत्नीने चपलीने मारहाण करण्यास सुरुवात केली. सिंधू सानप यांनी मध्यस्थी केली असता त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मी सर्व प्रकरणाचा व्हिडीओ शूट केला आहे”. दरम्यान सिंधू सानप यांनी सरकारी पैसे खाऊ देत नसल्याने आपल्याला धमकी देत होते असा आरोप केला आहे.
राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत सांगितलं की, “आरोपींना आज सकाळी अटक करण्यात आली असून कठोरात कठोर कारवाई केली जाईल. अशा प्रकारची कृत्यं सहन केली जाणार नाहीत”.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून याबाबत सातारा पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले असल्याचं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply