गोव्यात भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, उत्पल पर्रीकरांचा पत्ता कट

पणजी : २० जानेवारी – गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांकेलीम मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर हे मडगावमधून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. गोव्यातील विधानसभेच्या ४० जागांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान होणार असून १० मार्चला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे दिवंगत संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपने उमेदवारी दिलेली नाही. तिथून विद्यमान आमदार अतानासिओ मोन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनोहर पर्रीकरांचे यांचे कुटुंब हेच आमचे कुटुंब असून उत्पल पर्रीकर यांना दुसऱ्या जागेवर उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पर्रीकर यांचे कुटुंब हेच आमचे कुटुंब आहे. आम्ही उत्पल पर्रीकर यांना पणजी वगळता दोन जागांचा पर्याय दिला होता. त्यांनी जागा नाकारली होती. दुसऱ्या जागेची चर्चा सुरू आहे. ते त्या जागेवरून निवडणूक लढवण्यास तयार होतील, अशी आम्हाला आशा आहे, असे फडणवीस म्हणाले.
उत्पल पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघातून प्रचारही सुरू केला होता आणि घरोघरी जाऊन ते मतदारांना भेटत होते. भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे संकेलीम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. आम्ही गोव्यातील तीन सर्वसाधारण जागांवर एसटीचे उमेदवार उभे केले आहेत, तर एका सर्वसाधारण जागेवर एससी उमेदवार उभे केले आहे. १२ ओबीसी उमेदवार आहेत, ९ अल्पसंख्याक (ख्रिश्चन) उमेदवार आहेत, असे भाजप नेते अरुण सिंह म्हणाले.
गेल्या दहा वर्षांत भाजप सरकारने स्थैर्य आणि विकास केल्याचे गोव्यातील जनतेने पाहिले आहे. गोव्याचा चेहरामोहरा बदलला. मनोहर पर्रीकरांपासून ते विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंतांपर्यंत भाजपने चांगली प्रतिमा असलेले मुख्यमंत्री दिले आहेत. काँग्रेसमुळे गोव्याची प्रतिमा डागाळली असून त्यांना केवळ लुटीच्या राजकारणासाठी सत्ता हवी आहे, असा घणाघात भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Leave a Reply