मूळचे नागपूरचे असलेले जनरल मनोज पांडे देशाचे नवे उपसैन्यदलप्रमुख

नागपूर : १९ जानेवारी – मूळचे नागपूर येथील लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची देशाचे नवे उपसैन्यदलप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. गेल्या ३७ वर्षांपासून सैन्यात सेवारत लेफ्टनंट जनरल पांडे सध्या पूर्व कमांडचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. लष्करप्रमुख आणि उपसैन्यदलप्रमुख या दोन्ही पदांवर मराठी व्यक्तींचा योग जुळून आला आहे.
पांडे यांच्या निवडीवर केंद्र सरकारने मंगळवारी शिक्कामोर्तब केले. विद्यमान उपसैन्यदलप्रमुख लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती हे ३१ जानेवारी रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर पांडे सूत्रे हाती घेतील. नागपूर विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे माजी प्रमुख; ज्येष्ठ मानसतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर पांडे आणि नागपूर आकाशवाणीच्या उद्घोषिका प्रेमा पांडे यांचे ते पुत्र होत. पांडे यांचे लहान बंधू संकेत पांडे लष्करात कर्नल होते. सर्वांत लहान बंधू डॉ. केतन पांडे हे ब्रुनोईच्या राजाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी होते.
लेफ्टनंट जनरल पांडे यांचे प्राथमिक शिक्षण नागपूरस्थित वायुसेनानगरातील केंद्रीय विद्यालयात झाले. अकरावीनंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून पुण्याच्या नॅशनल डिफेन्स ॲकॅडमीत दाखल झाले. हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी डेहराडूनच्या मिलिटरी इंजिनीअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. १९८२मध्ये ते पुण्याच्या कोर ऑफ इंजिनीअर्स (बॉम्बे सॅपर्स) या लष्कराच्या अभियांत्रिकी सेवेत रुजू झाले. कॅम्बर्ली (ब्रिटन) स्टाफ कॉलेज, महूचे आर्मी वॉर कॉलेज, दिल्लीच्या नॅशनल डिफेन्स कॉलेजमधून त्यांनी ‘हायर कमांड कोर्स’ केला आहे.

Leave a Reply