गोव्यात अमित पालेकर आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा

पणजी : १९ जानेवारी – गोव्यात आम आदमी पक्षाने अमित पालेकर यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवले आहे. मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीसाठी त्यांचे नाव आघाडीवर होते. आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भंडारी समाजाचा असेल, असे ‘आप’ने आधीच सांगितले होते. अरविंद केजरीवाल मंगळवारी गोव्यात पोहोचले. यानंतर केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अमित पालेकर यांच्या नावाची घोषणा केली. गोव्यातील सुमारे ३५ टक्के लोकसंख्या भंडारी समाजाची आहे.
गोव्यातील जनता विद्यमान पक्षांना कंटाळली आहे. नेत्यांनाही कंटाळली आहे. त्यांनी राजकारणावर कब्जा केला आहे. सत्तेत राहून पैसे कमवा आणि मग त्या पैशाने सत्तेत या. याममुळे गोव्यातील जनतेला बदल हवा आहे. त्यांच्याकडे पर्याय नव्हता. पण आता आम आदमी पार्टी आली आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
आम आदमी पार्टी हा नवा पक्ष आहे. ज्यांनी कधीही निवडणूक न लढवली, अशा अनेक सामान्य गोवावासीयांना आम्ही तिकीट दिले आहे. आम्ही गोव्याला एक चेहरा देत आहोत, ज्यांच्या हृदयात गोवा आहे, ज्याचे हृदय गोव्यासाठी धडधडते, जो गोव्यासाठी आपले प्राण देऊ शकतो. तो सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेईल. मग तो उत्तर गोव्याचा असो किंवा दक्षिण गोव्याचा, मग तो कुठल्याही जाती-धर्माचा असो. तो सुशिक्षित असावा, ज्याला कोणीही मूर्ख बनवू शकत नाही, असे दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply