संपादकीय संवाद – नानांचा गावगुंड मोदी खरा की डमी? वास्तव समोर यावे

भारतात लोकशाही आहे, त्यामुळे कुणीही कुणालाही, काहीही म्हणू शकतो, असे असले तरी काही व्यक्तींची आणि काही पदांची गरिमा सांभाळली जायलाच हवी. मात्र आम्हाला हव्या त्या व्यक्तीची गरिमा आम्ही सांभाळू आणि इतरांना आम्ही वाटेल तश्या शिव्या देऊ, मग ती व्यक्ती कितीही मोठी का असेना, अशी भूमिका घेणे कितपत योग्य? असा प्रश्नही निर्माण होतो.
हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या गृहजिल्ह्यात केलेले विधान. हे विधान काल समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आणि संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. नानांचे विरोधक नानांवर चढले, त्यांच्या विरोधात राज्यभर निदर्शने आणि आंदोलने सुरु झाली, ठिकठिकाणी त्यांच्या विरोधात पोलीस तक्रारीही करण्यात आल्या आहेत. नंतर नानांनी त्या विधानावर सारवासारव देखील केली आहे. अर्थात जो बुंद से गयी वो हौद से नही आती, हे तत्व नानांच्या बाबतीतही लागू पडते.
नाना नेमके काय म्हणाले, हे वाचकांना सांगायची गरज नाही तरीही पुन्हा सांगतो, मी मोदींना केव्हाही शिव्या देऊ शकतो, प्रसंगी मारूही शकतो, असे विधान त्यांनी केले आहे. हे विधान ऐकल्यावर यातील मोदी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी हेच आहेत, असे शेम्बडे पोरही सांगेल, मात्र नानांच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्या गावातल्या कुणी मोदी नामक गावगुंडांबाबत हे विधान केले आहे. तो गावगुंड कोण? हे जाहीर करा असे विरोधकांनी त्यांना आव्हानही दिले आहे. दरम्यान या मोदी नामक गावगुंडाला भंडारा पोलिसांनी अटक केल्याची बातमी आली आहे. आता तो खराखुरा मोदी आहे, की कुणी डमी मोदी? हा प्रश्नही उपस्थित केला जाईलच.
सार्वजनिक जीवनात विशेषतः राजकारणात बोलतांना फार सांभाळून बोलावे लागते, पूर्वी ठीक होते, पण आता विविध वृत्तवाहिन्यांचे आणि समाजमाध्यमांचे कॅमेरे तुमच्या अवतीभवती फिरत असतात. तुम्ही काय बोलता आहेत हे कोण आपलय कॅमेऱ्यात रेकॉर्ड करेल, आणि आपल्या समाजमाध्यमात टाकेल, याचा भरवसाच राहिलेला नाही. काही वर्षांपूर्वी प्रदेश काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष माणिकराव ठाकरे माजी मंत्री सतीश चतुर्वेदींशी बोलतांना काही आक्षेपार्ह विधान करते झाले, ते सर्व वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केलं, आणि त्या प्राकृत तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आपली खुर्ची गमवावी लागली. हा इतिहास तसा ताजाच आहे. त्या काळातही नाना राजकारणात सक्रिय होतेच, त्यामुळे नानादेखील ती घटना विसरले नसणार. तरीही नानांची अशी जीभ घसरावी, हे बरोबर वाटत नाही.
नाना जे काही बोलले होते, ते खासगीतच बोलले होते. तरीही ते एखाद्या गावगुंडांबद्दल बोलले, हा खुलासा काही पटणारा नाही. त्यामुळे नाना बोलले तो नेमका गावगुंड कोण? त्याचा संदर्भ काय? या सर्व प्रकारची सखोल चौकशी होऊन ते महाराष्ट्रासमोर यायला हवे. अन्यथा नाना बोलले मोदींबद्दलच पण अंगलट येताच गावगुंडांचा उल्लेख केला, आणि स्वतःचा बचाव केला, असा जनसामान्यांचा समज होऊ शकतो. या मोदी नामक कथीत गुंडाला पोलिसांनी पकडले आहे, अशी बातमी आहे. आता तो खराखुरा मोदी आहे, की पोलिसांनी नानांची इज्जत वाचवण्यासाठी कुणीतरी डमी मोदी उभा केला आहे, हे देखील सर्वांसमोर यायला हवे, कारण महाराष्ट्रात सरकार नानांचेच आहे. आपली कातडी वाचवायला काहीही केले जाऊ शकते ही भीती सर्वांच्या मनात आहेच.

अविनाश पाठक

Leave a Reply