बकुळीची फुलं – भाग : ७ – शुभांगी भडभडे

5 sep shubhangi bhadbhade

माझी आजी बालविधवा होती . खुप धार्मिक , कठोर शिस्तीची सोवळं ओवळं पाळणारी, बोलण्यात व-हाडी शब्दाचा वापर करणारी, पण मनाने खुप खुप चांगली होती. तरी तिचा धाक आम्हा सर्वांना होता. आईला तिने कधी स्वयंपाक करू दिला नाही , सोवळ्यातला देवाचा नैवेद्य आणि पूजा तिने सोडली नाही . कथाही सांगायची . आम्हाला आवडेल ते करायची पण आम्ही मनातून तिला घाबरत होतो .

कारणही तसंच घडलं होतं .

दादांनी नवं बाथरूम सिंमेंट वापरून बांधलं होतं . आई येणार म्हणून असेल कदाचित . तसं न्हाणीघर होतं . त्यात मोठी चुल , त्यावर हंडा .पाणी घेण्याची पितळी बादली आणि स्नानासाठी गंगाळ होतं पितळीचं. आणि बरंच अंधारी होतं न्हाणीघर. दाराला लुगडं दिसलं की कुणी आत आहे समजायचं. त्यामुळे असेल कदाचित नविन बाथरूम बांधलं आणि आजी बाहेर गेली असतांनाच , तुळशी वृंदावना जवळ असलेली संगमरवरी आडवा दगड त्यांनी बाथरूम मधे नेला आणि वृंदावनाजवळ एक दगड तेवढाच आणून ठेवला .

आजीच्या दोन चार दिवसात ते लक्षात आलं नाही . तिने मला विचारलं

” इथला पांढरा दगड कुठे गेला .?”

मी काही बोलले नाही .पण माझ्या भावांनी सांगितलं . आणि आजीचा रागाचा पारा चढला . तिने हाक मारली

” दादा , दादा कुठे आहेस तू ?”

दादा कुठे आहेत हे शोधायला मला पाठवलं. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी अरूंद जिना होत्या मातीवर लाकडाच्या पाय-या होत्या ह्या दीड महिन्यात चढत्या उतरण्याची चांगलीच सवय झाली होती .

एरवी वरच्या मजल्यावर कुणी राहातं नव्हतं . पण आम्ही आल्यापासून तिथे राहातं होतो . रंगीत काचांच्या दारातून रंगरंगीत ऊन यायचं शेणानी सारवलेल्या जमिनीवर आणि रात्री कौलं असलेल्या पत्रातून झिरपत चांदणं यायचं . सज्जात उभं राहिलं तर आंगण दिसायचं त्यात सडा संमार्जन होऊन त्यावर सुंदरशी रांगोळी असायची , तुळशी वृंदावनाजवळ लहान पण रेखीव रांगोळी आणि त्याखाली “श्रीराम प्रसन्न” असं लिहायची

आज ते काही लिहीलेलं नव्हतं.

मी धावत वर मांडीवर गेले . तोवर आजीच्या हाकाच चालू होत्या. दादा सज्ज्यात आले .

“ताईबाई असं झालंय काय?

” खाली ये अगोदर “

दादा शांतपणे खाली आले . तिच्या रागाची त्यांना जाणीव असावी.

“काय झालं असं मी इथला दगड नेला असंच ना ?”

“सांगून नेलास ?”

“तुझ्या देवघरातील सोनं तर नाही ना नेलं ?”

“अरे दादा, इथला संगमरवरी दगड मी रांगोळी काढायला मागवला होता , तुला माहिती आहे . तरी तो…” आजीचा आवाज चढलेला . तिला धाप लागली . क्षण भयाने ती पुन्हा तितक्यात जोरात बोलत होती .

शब्दाने शब्द वाढला . असं भांडण कधी पाहिल्याने आम्ही रडू लागलो . आई मधेच दादांना न बोलण्याची खुण केली. आजीला ते कळलं.

” सूनबाई माझं आणि माझ्या लेकाचं भांडण आहे . तू काही गुन्हा केला नाहीस , तू मधे बोलू नकोस.”

दादांनी उगाचंच वाढवत होते .

“माझा दगड दे “

“तुला काय करायचंय त्याच दगडाचं”

“मला हवाच . “

आजीचा हट्ट कायम होता . दोघंही माघार घ्यायला तयारच नव्हते. अखेर आजी म्हणाली

” दादा मला तो दगड मला आणून दे . मी उरावर नेईन मेल्यावर पण तुला देणार नाही”

आता दादांनी तो दगड आणून अंगणात टाकला . आणि रागारागात ते दिंडी दरवाजातून बाहेर गेले. आता आजी शांत झाली . आई ला किंवा आम्हाला बरं वाटेना.

आजी म्हणाली ,

“सूनबाई, असे मायलेकाचे वाद होतात . पोरगा रागावला तरी आपसूक घरी येतो . जाईल कुठे आपल्या आईला सोडून ? तू जा पोरांना दुध गरम करून दे . माझ्या चुलीला हात लावू नकोस त्या दुस-या चुलीवर कर . स्नानही झालंयतुझं , पोरांसाठी रांधून घे . गोडाचे काही तरी कर . बिचारी घाबरलीत . येईल दादा राग उतरला की.”

दुपार झाली दादा परतले नव्हते . आई जेवायची थांबली . तसं देवघरातून आजी म्हणाली

सूनबाई जेवलीस का? जेवून घे . येईल तो जातो कुठे ? जेवला असेल त्याच्या आत्याकडे , तू जेव . नाहीतर मी येऊन वाढते.”

आईनी मुकाट्याने आपलं ताट वाढून घेतलं . देवघरातून येऊन तिने खात्री करून घेतली .

देवाच्या नैवेद्याचा तिचा वेगळा स्वयंपाक झाला.. ती जेवली नाही. दादा आले नाहीत . संध्याकाळी ते आले . म्हणाले

” मी जेऊन आलो, माझ्या मित्राकडे “

आजी रागावली नाही . देवघरात निरांजन लावून रामायण वाचत बसली.

दोन तीन दिवस न बोलण्यात गेले.

आजी आईला म्हणाली .

“हा असाच आहे. लाडावून तर मीच ठेवलंय . मनातून दादा खुप चांगला आहे . ते जाऊ दे.आज शुक्रवार आहे देवीचा वार आहे . मी तुझ्यासाठी फुलाफुलांचं वायलचं लुगडं आणलंय .

तेनेस आणि बडकस जवळच्या शिरला मंदिरात मुलांना घेऊन जा . प्रार्थना कर , तुझ्या मुलांसाठी आणि माझ्याही मुलासाठी. “

आई नाही म्हणू शकली नाही . आम्ही देवळात गेलो . येतांनासंघकचेरीजवळ दादा भेटले. आई म्हणाली

” तुमच्या आईशी बोला . राग धरू नका. “

“मी कुठे रागावलो , तीच रागावली. बरं बोलतो . तुम्ही पुढे जा मी येतोच.”

दादा येताना तिला आवडतात म्हणून आंबे घेऊन आले. आजी हसली आणि घरचं हसू लागलं .

आजी अंगणात खाटेवर झोपली. आम्ही वरच्या माडीवर झोपायला गेलो . रात्रीचे अकरा वाजले असतील .

आजीची हाक आली .

“दादा, दादा लवकर खाली ये “

दादा , त्यांच्या मागे आई आणि मीही धावले .

आजी कशीबशी म्हणाली

“सुनबाई , देवघरात उजव्या बाजूच्या कोनाड्यात हेमगर्भाची मात्रा आहे ती उगाळून आणि . आम्ही आल्यापासून तिने आईला देवघरात पाऊलही ठेवू दिलं नव्हतं . देव सोवळ्यात होते. आईला सहाच सापडेना . ती भव्य देवप्रतिमांकडे पहात शोधत होती. आजीने मला सांगितलं .

“देवघराच्या खाली ती सरकवलेली आहे.”

मात्रा उगाळून आणे पर्यंत आजी दादांना म्हणाली .

“दादा, गंगाजल आण पुजेतलं . आणि माझ्या तोंडात घाल”

आजीचा मृत्यू तिला कळला असावा . आज वाटतं असा मृत्यू कळतो का ? सांगून येतो का तो? साधू संतांना, महात्म्यांना तो कळत असावा . मला येईल का सांगून मृत्यू ?. कळला तर मी स्वागत करीन. .

पहाता पहाता माझ्या डोळ्यासमोर आजीने डोळे मिटले कायमचे.

दादा खुप रडत होते . स्वतः ला दोष देत होते .

” मी तिच्या वृंदावनाजवळचा दगड घेतला म्हणून झालं असं . ताईबाई, तू उरावर दगड नेणार होतीस ना ? आता मला दगड नको . तूच हवी होतीस …. “

मग शेजारचे आले . सारेच मौन होते

असं पंधरा मिनिटांत जाणं काय असतं ते मला आता कळलं .

आजी गेली कायम मनात वास्तव्याला आली.

शरीराने माणूस जातो आणि मनात येऊन राहतो कायमचा. हेच खरं.

शुभांगी भडभडे

Leave a Reply