पैश्याच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा खून

वाशिम : १८ जानेवारी – वाशीम जिल्ह्यातील शिरपूर येथील दोन मित्र मकरसंक्रातीच्या दिवशी आपल्या घरातून बाहेर पडले होते. शिरपूर येथील चेतन मुंदडा आणि त्याचा मित्र श्रीकांत गोरे हे दोघे १४ जानेवारी च्या सायंकाळ पासून बेपत्ता होते. तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता. रविवारी सकाळी गोरे याच्या शेतातील विहिरीत मुरलीधर उर्फ चेतन मुंदडा याचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली होती तर त्याचा मित्र श्रीकांत गोरे हा बेपत्ता होता.
यानंतर चेतन मुंदडा याचे काका कचरूलाल मुंदडा यांनी शिरपूर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांचा पुतण्या मृतक चेतन धोंडुलाल मुंदडा (वय २० वर्ष) याला श्रीकांत महादेव गोरे हा त्याच्या दुकानातुन त्याच्या सोबत मोटार सायकलवर घेवून गेला होता. परंतु रात्र होवुन ही ते दोघे घरी आले नव्हते, त्यामुळे त्यांनी शिरपुर पोलीसात पुतण्या चेतन मुंदडा हरविल्या ची नोंद केली होती. दोन दिवसांनी रविवार १६ जानेवारी २०२२ रोजी महादेव गोरे यांच्या शेतातील विहीरीमध्ये पुतण्या चेतन मुंदडा याचा प्रेत पाण्यावर तरंगताना आढळून आला.
चेतन मुंदडा याचा मृतदेह शिरपूर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने विहिरी बाहेर काढला. चेतन मुंदडा याच्या डोक्यावर गंभीर जखम असल्यानं हा खून करण्यात आल्याची शक्यता होती तसेच त्याचा मित्र श्रीकांत गोरे हा बेपत्ता होता. सदर गुन्ह्याचा पोलीस अधिक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधिक्षक गोरख भामरे, उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनात शिरपुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील वानखडे यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक जगदिश बांगर यांनी तपास पथक गठित करुन आरोपीचा शोध सुरू केला.
पोलिसांच्या पथकाने आपली यंत्रणा कामाला लावली अन् चेतन मुंदडा याचा बेपत्ता असलेला मित्र श्रीकांत गोरे याला शोधून काढलं. २४ तासांच्या आता श्रीकांत गोरे याचा ठावठिकाणा लावण्यात पोलिसांना यश आले. श्रीकांत गोरे यानेच मित्र असलंलेल्या चेतन मुंदडा याचा खून केल्याचं तपासात समोर आलं आहे.
पैशांच्या व्यवहारातून श्रीकांत याने चेतन याची हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी श्रीकांत गोरे याला अटक केली आहे. आता श्रीकांत गोरे याच्या चौकशीत हत्येमागचं नेमकं कारण काय आहे हे समोर येईल.

Leave a Reply