गडचिरोलीत १०९ वर्षांच्या आजीबाईंने मोठ्या उत्साहात केले मतदान

गडचिरोली : १८ जानेवारी – तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साहात एका १०९ वर्षांच्या आजींनी दाखवला. गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात चार ग्रामपंचायतीमध्ये पाच जागांसाठी १८ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळच्या टप्प्यात संथगतीने मतदान सुरू झाले होते. यातच गोविंदपुर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक-२ साठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोविंदपुर येथील मतदान केंद्रावर १०९ वर्षांच्या आजी पोहोचल्या. मतदान करून त्यांनी युवा पिढीला महत्त्वाचा संदेश सुद्धा दिला आहे.
फुलमती बिनोद सरकार असे आजींचे नाव असून त्यांचा जन्म ०१/०१/१९१३ रोजी झाला आहे. आजीचा मतदानाचा उत्साह कौतुकास्पद होता. या आजींनी शंभरी पार केल्याने त्यांना चालता येत नव्हतं आणि ऐकू सुद्धा येत नव्हता. मात्र, आधारासाठी आपल्या नातवाच्या बरोबरीने स्कुटीने मतदान केंद्रावर जाऊन स्वतः मतदान करीत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला. मतदानाकडे पाठ फिरवणाऱ्या तरुण वर्गासाठी १०९ वर्षाच्या आजींचा हा उत्साह आदर्शवत होता.
एवढेच नव्हेतर देशावर करोना महामारीचा संकट गोंगावत असताना सुरुवातीला गडचिरोली जिल्ह्यात लसीकरणासाठी नागरिकांचा विरोध होता. या आजींनी लसीकरणातही पुढाकार घेऊन स्वतः लस घेऊन लसीकरणासाठी सर्वांनी पुढे यावे असेही आवाहन केले होते.
गडचिरोली जिल्ह्यातील बंगाली बहुल भागातील गोविंदपुर, सुंदरनगर, शांतीग्राम आणि कालीनगर या चार ग्रामपंचायती मध्ये एकूण पाच जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गोविंदपुर ग्रामपंचायत मध्ये प्रभाग क्रमांक-२ आणि ३ साठी चार उमेदवार,सुंदरनगर ग्रामपंचायत मध्ये प्रभाग क्रमांक-४ साठी दोन उमेदवार, कालीनगर ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक-३ साठी दोन उमेदवार, शांती ग्राम ग्रामपंचायत मध्ये प्रभाग क्रमांक-१ साठी दोन उमेदवार असे एकूण १० उमेदवार रिंगणात आहेत. या चार ग्रामपंचायतीतील पाच जागांसाठी ३ हजार ७३२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.

Leave a Reply