आता पोलिसांची जबाबदारी, त्यांनी पटोलेंनी अटक करावी, हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा – नारायण राणे

मुंबई : १८ जानेवारी – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन सध्या मोठा राजकीय वाट निर्माण झालाय. ‘मी मोदीला मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असं नाना पटोलेंनी भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे कार्यकर्त्यांशी बोलताना म्हटलं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी नाना पटोलेंवर तिखट शब्दांमध्ये टिका केलीय. तर दुसरीकडे नाना पटोलेंनी हा व्हिडीओ खोडसाळपणे व्हायरल केला जात असल्याचा दावा करताना आपण मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबद्दल असं म्हणालो होतो, असं स्पष्टीकरण दिलंय. सध्या या प्रकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजपा असा संघर्ष सुरु असतानाच काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त विधान केल्याने अटकेची कारवाई झालेले केंद्रीय मंत्री नाराणय राणे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलंय.
‘‘मी एवढ्या वर्षांच्या राजकारणात एकही शाळा काढली नाही किंवा ठेकेदारी केली नाही. जो आला, त्याला वाटत गेलो, म्हणूनच मोदींना मारू शकतो, शिवी देऊ शकतो. म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले नाही,’’ असं नाना पटोले म्हणाले. त्यांच्या या विधानाची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात पटोले यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राजकीय वर्तुळात वादळ उठले असून यामुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
“महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांबद्दल वक्तव्य करताना वापरलेल्या आपत्तिजनक भाषेचा मी निषेध करतो. काँग्रेसचे नेते या स्तरापर्यंत खाली जातील याचं मला आश्चर्य मला वाटत नाही,” असं राणे ट्विटवरुन प्रतिक्रिया देताना म्हणालेत. त्यांनी या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींबरोबर भाजपा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनाही टॅग केलंय. अन्य एका ट्विटमध्ये नारायण राणेंनी, “आता पोलिसांची जबाबदारी आहे की त्यांनी पटोलेंनी अटक करावी. हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्दा आहे,” असं म्हटलंय.
सर्वच राजकीय पक्षांकडून पटोले यांच्या विधानाची निंदा केली जात आहे. भाजपा नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत पटोलेंच्या विधानाचा समाचार घेतला. पंजाबमध्ये पाकिस्तानच्या सीमेलगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनाचा ताफा २० मिनिटे खोळंबून राहतो, पण तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री साधी दखलसुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो.. असं विधान करतात. काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय? कधी काळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला गेला. काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे की दहशत पसरवणारी संघटना, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील नाना पटोलेंच्या वक्तव्यावरुन नाराजी जाहीर करत ट्वीट केलं आहे. नाना पटोलेंना अटक केली जावी अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी,” अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली आहे.

Leave a Reply