संपादकीय संवाद – उद्धवपंत विरोधकांवर टीका करताना जरा जपून

महाआघाडी सरकारचे मुख्यमंत्री सध्या घरूनच विरोधकांवर शरसंधान साधण्याचे काम करीत आहेत, तसेही मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी घरातूनच जास्तीत जास्त राज्यकारभार हाकला आहे. आता तर आजारपणाचे निमित्तच झाले आहे, त्यात कोरोनाही मदतीला आला आहे, त्यामुळे घरूनच विरोधकांवर जोर काढायचा, असा त्यांचा कार्यक्रम सुरु आहे.
गेल्या आठवड्यात त्यांनी दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये विरोधकांवर टीकास्त्र सोडले. त्या दोनही भाषणांचा मतितार्थ लक्षात घेतला तर, विरोधकांच्या प्रश्न विचारण्यावर आणि टीका करण्यावर साधलेले ते शरसंधान होते. प्रश्न विचारायला काही फारशी अक्कल लागत नाही, प्रश्न कुणीही विचारतो, अश्या प्रकारची ती टीका असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसारित झाले होते.
लोकशाही व्यवस्थेत सत्ताधारी आणि विरोधक हे दोन महत्वाचे घटक मानले जातात, सत्ताधाऱ्यांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन करायचे आणि झालेल्या चुकांबद्दल प्रश्न विचारून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरायचे हे विरोधकांचे मुख्य काम असते. उद्धव ठाकरेंची शिवसेना बरीच वर्ष विरोधी पक्षातच होती, त्यावेळी शिवसेनेची मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ, मनोहर जोशी, सुधीर जोशी, नारायण राणे, रामदास कदम हे सर्व दिग्गज वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रश्न विचारून सत्ताधाऱ्यांना हैराण करण्याचे काम करायचे, त्यातून अनेकदा महत्वपूर्ण समस्यांची सोडवणूकही होत असे. आता प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही, असे उद्धवपंतांनी म्हटले, तर मग या सर्व दिग्गजांना काहीही अक्कल नव्हती, असे मानायचे का? याचे उत्तरही उद्धवपंतांनी द्यायला हवे. सध्या ज्या महाविकास आघाडीचे उद्धवपंत मुख्यमंत्री आहेत, त्या महाविकास आघाडीचे कर्तेकरविते शरद पवार हेदेखील काही काळ विरोधी पक्षात होते, सुमारे ६ वर्ष ते लोकसभेत विरोधी पक्षनेतेही होते, विरोधी पक्षनेता या न्यायाने त्यांनी राज्य विधिमंडळात आणि संसदेत अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले, आणि त्यांची तडही लावली, आता उद्धवपंतांनी दिलेल्या व्याख्येनुसार शरद पवारांनाही अक्कल नव्हती असे म्हणावे लागेल.
उद्धव ठाकरे यांची विधिमंडळात येण्याची ही पहिलीच वेळ असली तरी महाराष्ट्रातल्या एक अप्रमुख पक्षाचे पक्षप्रमुख म्हणून त्यांनी जवळजवळ २० वर्ष काम केलेले आहे. त्यामुळे जनहिताच्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी आणि त्यांच्या आधी शिवसेना प्रमुख असलेले त्यांचे दिवंगत वडील बाळासाहेब ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला होता. आता उद्धपंतांना किंवा स्वर्गीय बाळासाहेबांना अक्कल नव्हती असे म्हणण्याचे धाडस कुणीही करणार नाही. तरीही उद्धवपंतांनी मांडलेला मुद्दा लक्षात घेता जनसामान्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकतेचं.
राजकारणात विरोधकांवर टीका ही करायचीच असते, मात्र ती टीका करतांना वास्तवाचे भान ठेवायला हवे. एखाद्याकडे एक बोट दाखवले तर तीन बोटे आपल्याकडे येतात याची आठवण ठेवायलाच हवी, अन्यथा आपलीच टीका आपल्यावरच उलटू शकते, याचे भान ठेवायला हवे.
म्हणूनच सांगावेसे वाटते उद्धवपंत विरोधकांवर टीका करतांना जरा जपून करा.

अविनाश पाठक

Leave a Reply