संपादकीय संवाद – अश्या डॉक्टरांना समाजाने आणि शासनाने धडा शिकवायला हवा.

सध्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे जे काही घडते आहे, ते प्रकरण अतिशय गंभीर मानावे लागेल. डॉ. रेखा कदम यांच्या नर्सिंग होममध्ये झालेले अवैध गर्भपात आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या या सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलेले आहे.
गर्भपात हा भारतीय कायद्यानुसार अवैध ठरविण्यात आला आहे, तरीही सर्वसहमतीने विशिष्ट कालावधीपर्यंत गर्भपात करण्यास कायद्याने परवानगी दिली आहे. अर्थात त्यासाठीही संबंधित यंत्रणेची परवानगी गरजेची आहे. मात्र अर्विमध्ये जे काही घडते आहे, ते सगळे कायदा धाब्यावर बसवूनच घडले असावे, असे मानण्यास बराच वाव आहे. जर कायदा धाब्यावर बसवून इथे नियमित भ्रूणहत्या होत असतील, तर ते अनैतिकच मानावे लागेल.
यातला आणखी खास भाग असा की या रुग्णालयात नियमित गर्भपात करणारी ही दुसरी पिढी असल्याची बाब समोर आली आहे. या रुग्णालयाच्या विद्यमान संचालिका रेखा कदम यांच्या सासूबाई डॉ. शैलजा कदम यांनी हे रुग्णालय सुरु केले होते, गर्भपात नियमितरित्या करणे हे काम डॉ. शैलजा यांनी दीर्घकाळ केले, त्यांच्यानंतर त्यांची सून रेखा या सदर रुग्णालयाचा कार्यभार सांभाळत होत्या. त्यांनीही सासुचीच परंपरा पुढे चालू ठेवली. त्यांनी असे किती गर्भपात घडवले, याची कुठेही मोजदाद नसावी. त्यामुळेच पोलीस यंत्रणांनी तपास केल्यावर रुग्णालयाच्या बायोगॅस चेंबरमध्ये भ्रूणाच्या कवट्या आणि हाडे मोठ्या प्रमाणात सापडले, म्हणजेच अवैधरित्या गर्भपात करायचे आणि त्या भ्रूणांची विल्हेवाट रुग्णालयाच्याच परिसरात लावायची हा त्यांचा गोरखधंदा वर्षानुवर्षे सुरु होता. हे सर्व प्रकार सुरु असताना शासकीय यंत्रणेला लक्षात येऊ नये हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
आपल्या देशात असे अवैधरित्या वैद्यकीय क्षेत्रात लुडबुड करणारे बरेच लोक आहेत. गेल्या आठवड्यातच वसईतील एका बोगस डॉक्टरचे प्रकरण समोर आले होते. असे प्रकार होणे म्हणजे रुग्णांच्या जीवनाशी खेळणे आहे,. अश्या डॉक्टरांना समाजाने आणि शासनाने कधीच माफ करू नये, रच असे करणाऱ्यांना धाक बसेल, इतकेच यावेळी सुचवावेसे वाटते.

अविनाश पाठक

Leave a Reply