दुधातील माशी प्रमाणे मित्रपक्षांना बाजूला फेकले – जोगेंद्र कवाडे यांची काँग्रेस व राष्ट्रवादीवर टीका

बुलडाणा : १६ जानेवारी – राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारची स्थापना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र येत केली. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला आता दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांचे मित्र पक्ष नाराज झाल्याचं समोर आले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मित्र पक्ष असलेल्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केलीय. दुधातील माशी प्रमाणे मित्रपक्षाने बाजूला फेकले, असा आरोप जोगेंद्र कवाडे यांनी केलाय. तर, मित्र पक्षाला जाणीव करण्यासाठी राज्यात करणार राजकीय उपद्रव मार्च काढणार असल्याचं जोगेंद्र कवाडे यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देखील भूसंपादनाच्या मुद्यावरुन राज्य सरकारवर टीका केलीय. या निमित्तानं महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांवर त्यांचे मित्र पक्ष नाराज झाल्याचं समोर येत आहे.
जोगेंद्र कवाडे नेमकं काय म्हणाले?
दुधातील माशी प्रमाणे मित्रपक्षाने बाजूला फेकले असल्याचा आरोप जोगेंद्र कवाडे यांनी केलाय.राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना शिवसेनेला सोबत घेऊन आघाडी करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. मात्र, ही आघाडी झाल्यानंतर दुधातील माशी बाजूला फेकावी अशा पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी या मित्रपक्षाने आम्हाला बाजूला फेकल्याचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी म्हटले आहे. मित्र पक्षाला त्यांच्या कृतघ्नतेची जाणीव करून देण्यासाठी संपूर्ण राज्यभर राजकीय उपद्रव मार्च काढला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले आहे. ते बुलडाण्यात पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते.
औरंगाबाद विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या लढा दरम्यान अनेकांचे प्राण गेले होते. या सर्व शहिदांना मानवंदना देण्यासाठी ते देऊळगाव राजा तालुक्यातील राहेरी पूल या ठिकाणी लॉंग मार्च संघर्ष भूमी याठिकाणी आले होते. यावेळी बुलडाण्यात पत्रकार परिषदे दरम्यान कवाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Leave a Reply