तुम्ही टेस्ला कारचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट महाराष्ट्रही बनवू शकता – जयंत पाटील यांचे एलन मस्क यांना आवतन

मुंबई : १६ जानेवारी – तुम्ही टेस्ला कारचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट महाराष्ट्रही बनवू शकता. महाराष्ट्रात या, असं आवतनच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सुप्रसिद्ध टेस्ला कारचे मालक एलोन मस्क यांना दिलं आहे.
जयंत पाटील यांनी ट्विट करून एलोन मस्क यांना हे आवतन दिलं आहे. सुप्रसिद्ध टेस्ला कारचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही महाराष्ट्रात बनवू शकता, असं पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. सुप्रसिद्ध टेस्ला कारचं लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आकर्षण आहे. ही कार भारतात कधी लाँच करणार असा प्रश्न ट्विटरवरील एका युजरने एलोन मस्क यांना विचारला त्यावर काही शासकीय नियमांच्या अडचणींचा सामना करत असल्याचे मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे, तुमच्या उभारणीसाठी तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. सुप्रसिद्ध टेस्ला कारचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही महाराष्ट्रात बनवू शकता असं म्हणत पाटील यांनी एलोन मस्क यांना महाराष्ट्रात आमंत्रित केले आहे.
दरम्यान, देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अशा वाहनांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जर्स / चार्जिंग स्टेशनवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे. याशिवाय रस्ते वाहतूक मंत्रालयाने अधिसूचना जारी केली असून राज्यांना इलेक्ट्रिक वाहनांवरील रस्ता कर माफ करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची सुरुवातीची किंमत कमी करण्यात मदत होणार आहे. त्यातच आता पाटील यांनी एलोन मस्क यांना महाराष्ट्रात उद्योग सुरू करण्याचं आमंत्रण दिल्याने मस्क काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply