ओंजळीतील फुलं : १५ – महेश उपदेव

28 dec mahesh updeo final

शिवाजीनगर जिमखान्याची उत्तुंग भरारी

राज्यात बास्केटबॉल क्षेत्रात शिवाजीनगर जिमखान्याचे नाव प्रसिद्ध आहे. राज्यात कोणतीही आमंत्रित बास्केटबॉल स्पर्धा असो त्या स्पर्धेत शिवाजीनगर जिमखान्याच्या संघाला आमंत्रित केल्याशिवाय स्पर्धा पूर्ण होऊ शकत नाही. तीन श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंसह शेकडो राष्ट्रीय खेळाडू देणाऱ्या एसएनजी संघाला राज्यात एक प्रतिष्ठा आहे. या जिमखान्याच्या मी आजीवन सदस्य असल्याचा मला अभिमान आहे. एका छोट्या रोपट्याचा आता वटवृक्ष बहरला आहे. आज शिवाजीनगर त्रिकोणी पार्क वरील मैदानावर शेकडो खेळाडू खेळतांना पाहून एक वेगळाच आनंद मिळतो. गेल्या ३५ वर्षात जिमखान्याने उत्तुंग भरारी मारली आहे.
हा संघ उभारण्यात जीएस कॉलेजचे माजी प्राध्यापक अरुण दाणी यांच्यासह मी, रवींद्र चीनमुलवार, निशिकांत वाघमारे, मुन्ना वर्मा, बंडू घाटे यांचा सिंहाचा वाटा आहे. जिमखान्याच्या आता धुरा छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेता शत्रुघ्न गोखले सांभाळत आहे.
बजाजनगरच्या नूतन भारत युवक संघाकडून मी, अरुण दाणी सर, रवींद्र चीलमुलवार, निशिकांत वाघमारे, सुबोध दीक्षित, आम्ही खेळात होतो. एनबीवायएसचा संघ तेव्हा नागपुरात अव्वल स्थानी होता. आमच्या संघात राष्ट्रीय खेळाडू दीपक मोघे, नरेंद्र उर्फ बन्ज्या देशमुख, गजानन जाधव, अशोक चांदे, अभय कपले हे खेळाडू होते. विदर्भातील कोणतीही स्पर्धा असो त्याचे विजेतेपद आम्ही खेचून आणत होतो.
१९८२-८३ च्या दरम्यान बजाजनगरच्या मैदानात मातीच्या कोर्टवर मेहनत घेऊन खेळत होतो. बंडू लालखेडकर, प्रकाश साठे, रमेश बक्षी, मोहन साठे, यांचे मार्गदर्शन मिळत होते. चांगली कामगिरी सुरु असताना आमच्या संघाला द्रिष्ट लागली.
काही कारणामुळे आमचा वरिष्ठ खेळाडूशी वाद झाला. त्यामुळे मी रचिन्द्र चीनमुलवार, निशिकांत वाघमारे, मुन्ना वर्मा यांच्यासह तीन-चार खेळाडूंनी आम्ही नूतन भारत युवक संघाला रामराम ठोकला. त्यावेळी नागपुरात अपोलो बास्केटबॉल क्लब युवक क्रीडा मंडळ, अमेच्युयर बास्केटबॉल क्लब, रेशीमबाग क्रीडा मंडळ असे बोटावर मोजण्यासारखे क्लब अस्तित्वात होते. आपण कोणत्या क्लबमध्ये सहभागी व्हायचे असा प्रश्न पडला होता.
त्यावेळी प्राध्यापक अरुण दाणी यांनी नूतन भारत युवक संघ सोडून सुभेदार हॉलजवळील विद्यापीठाच्या मैदानावर महाराष्ट्र क्रीडा मंडळांतर्गत बास्केटबॉल क्लब सुरु केला होता. प्राध्यापक दाणी सरांना आम्ही जाऊन भेटलो. त्यांना सविस्तर माहिती दिल्यानंतर सरांनी आम्हाला आजपासूनच क्लबमध्ये सहभागी होण्यास परवानगी दिली. आम्ही एमकेएम कडून खेळायला लागलो. त्यानंतर एनबीएस चे काही खेळाडू आमच्यात सहभागी झाले. त्यात आताचे राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले मकरंद जोशी याचा समावेश होता.
नागपुरात त्यावेळी अपोलो बास्केटबॉल क्लबने स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेत एमकेएम ने नूतन भारत युवक संघाचा अंतिम सामन्यात दारुण पराभव करून अजिंक्यपद मिळवले. महाराष्ट्र क्रीडा मंडळाचे सर्वेसर्वा, नागपूर विद्यापीठ शारीरिक शिक्षण विभागाचे उपसंचालक अरुण गडकरी यांनी आमचे कौतुक करून शाबासी दिली. त्यादरम्यान आम्ही अनेक स्पर्धा जिंकल्या. आपल्याजवळ चांगले मैदान असावे याचा शोध घेत होतो. अरुण दाणी सरांना माहिती मिळाली की धरमपेठ येथील त्रिकोणी पार्कमधील मैदान मोकळे आहे. तेथे असामाजिक तत्वाचे लोक गोंधळ करीत असतात. आम्ही तेथे बास्केटबॉल सुरु करावा यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यात आम्हाला यश मिळाले.

एक बल्ली, एक रिंग लावून खेळ सुरु

शिवाजीनगरमध्ये क्लब सुरु करण्याकरिता पायाभूत सुविधा कशा उपलब्ध होतील यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केले. या मैदानात एक बल्ली जमिनीत गाडून बल्लीला रिंग लावून खेळणे सुरु केले. याचा फायदा आम्हाला अचूक शूटिंग करण्याकरिता मिळाला. मैदान साफ झाल्यानंतर रोज अहोरात्र मेहनत घेऊन मैदान तयार केले. खेळ बहरायला लागला. त्यामुळे खेळाडूंची संख्याही वाढायला लागली. मैदानात रात्री बसून मद्यप्राशन करणाऱ्यांचा आमच्या पद्धतीने बंदोबस्त केला. त्या परिसरात राहणारे डॉ. सतीश काळे, अविनाश बेंद्रे, पेंढारकर, एनआयटीचे माजी सभापती अरुण पाटणकर यांची मदत मिळाली आजूबाजूचे लहान मुले-मुली मैदानावर खेळायला लागली, त्यात नितीन पटवर्धन, पराग पेंढारकर, निवेदिता पेंढारकर, सरिता काळे, यांच्यासह आजूबाजूचे अनेक मुले मैदानावर यायला लागली. महाराष्ट्र क्रीडा मंडळ अरुण दाणी, अजय गिरगावकर, रवींद्र पुंडलीक सरांचे मार्गदर्शन मिळाले. यादरम्यान आम्ही गोखले स्मृती व्हालीबॉल स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेला चांगले यश मिळाले. यादरम्यान मुलींचा संघ अरविंद गरुड यांनी एलएडी कॉलेजमध्ये मुलींचा बास्केटबॉल संघ तयार केला. मुलीनीपण राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केले.

कलाटणी

१९८३ मध्ये मिनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नागपुरात आयोजित करण्यात आली. त्यावेळचे क्रीडा अधिकारी सीताराम भोतमांगे व बाला हिमालयन यांनी आमच्या मैदानावर बास्केटबॉल स्पर्धा घेण्याचे ठरवले. त्यानिमित्ताने आम्हाला बास्केटबॉलचे डांबरी मैदान तयार करून दिले. या स्पर्धा चांगल्याच गाजल्या नागपुरातले पहिले डांबरी कोर्ट आमच्याजवळ होते. या दरम्यान खरे अँड तारकुंडे कंपनीचे भागीदार सुभाष खरे रोज मैदानाजवळून बॅटमिंटन खेळायला जायचे त्यांनी आम्हाला एक बल्ली व रिंग लावून खेळताना बघितले होते सुभाष खरे यांना हे बघवले नाही त्यांनी आम्हाला लोखंडी स्ट्रक्चर बोर्डसह तयार करून दिले. त्यानंतर आम्ही मागे वळून बघितलेच नाही. प्रवरा नगर येथे आम्ही राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा जिंकली आम्ही पाच सहा खेळाडूंनी सुरु केलेला क्लब चांगलाच बहरला. संजय जोग, प्रशांत रोहणकर, रज्जय (जिम्मी) कुमार, उमेश भदाडे, इंद्रकुमार झलके, विश्वनाथन हे खेळाडू तयार झाले. आनंद संचेती, आनंद कुरेकर, अभिजित पाटणकर , अरविंद जोशी, हे सहभागी झाले. हे मैदान तयार करण्याकरिता चांगलाच संघर्ष करावा लागला. त्याचे फळ आम्हाला मिळत आहे. शिवाजीनगर जिमखान्यावर त्यावेळचे धरमपेठचे नगरसेवक श्रीरंग खेडकर यांनी खेळाडूंना रात्री खेळता यावे याकरिता फ्लड लाईट ची व्यवस्था करून दिली होती. फ्लड लाइटमध्ये खेळणारा एकमेव आमचा संघ होता.

शिवाजीनगरची स्थापना

महाराष्ट्र क्रीडा मंडळ बंद करून आम्ही बास्केटबॉल करीता आपला खेळाडूंचा क्लब असावा या हेतूने शिवाजीनगर जिमखान्याची स्थापना केली. १९८६ मध्ये स्थापन झालेल्या शिवाजीनगर जिमखान्याने गेल्या ३५ वर्षात राज्यात उत्तुंग भरारी मारली आहे. ४ सिमेंट बास्केटबॉल कोर्ट, अत्याधुनिक व्यायामशाळा, महिलांसाठी निशुल्क योगाभ्यास केंद्र, अत्याधुनिक कार्यालयाचा समावेश आहे. आज जिमखाण्याचे ३५०च्या वर पाच वर्षांपासून ५० च्या वयोगटातील सदस्य आहेत. अविनाश बेंद्रे, डॉ. सतीश काळे यांच्या मार्गदर्शनात जिमखान्याची वाटचाल सुरु आहे.

हिंदुस्तानचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू

शिवाजीनगर जिमखाण्याच्या खेळाडूंनी देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही झेंडा फडकावला आहे. चाणक्य राव हा पहिला खेळाडू आहे त्याने भारतीय संघाच्या कॅम्पमध्ये प्रवेश मिळवला होता.
शिया देवधर ही हिंदुस्थान बास्केटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करत असून टोकियो, ऑस्ट्रेलिया इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत आपल्या खेळाचे कौशल्य दाखवून वाहवा मिळवली आहे. श्रद्धा औरंगाबादकर, मैथिली जोशी, शोमीला बिडीये, या महिला खेळाडू राज्याचे प्रतिनिधित्व करत आहे.
पंकज देशमुख, शत्रुघन गोखले, सतीश वॉरीयर हे तीन राष्ट्रीय खेळाडू असून राज्यसरकारने त्यांना छत्रपती पुरस्कार देऊन गौरविले आहे. पंकज देशमुख, श्रीहरी गर्गे हे दोघे आयकर विभागात कार्यरत असून प्रदीप मुखर्जी सेंट्रल रेल्वेचे प्रतिनिधित्व करीत आहे. आज नागपुरात बास्केटबॉल खेळाचा प्रसार झाला असून जिमखान्याच्या राष्ट्रीय खेळाडू अनेक शाळांमध्ये प्रशिक्षक म्हणून शेकडो खेळाडूंना प्रशिक्षित करीत आहे.

जय महाराष्ट्र

महेश उपदेव

Leave a Reply