उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपची १०७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

लखनौ : १६ जानेवारी – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १०७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर (अर्बन) मतदारसंघातून, तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सिरथू येथून निवडणूक लढवतील.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भाजपचे सरचिटणीस अरुण सिंग यांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी एकूण १०७ उमेदवारांची यादी नवी दिल्ली येथे जाहीर केली. भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत ६३ विद्यमान आमदारांना स्थान देण्यात आल्याचे, तर २० आमदारांनी इतर उमेदवारांसाठी आपल्या जागा सोडल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यासाठी ५७, तर दुसऱ्या टप्प्यासाठी ४८ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली.
प्रधान म्हणाले, ‘‘आम्ही निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील ५८ पैकी ५७ आणि दुसऱ्या टप्प्यातील ५५ पैकी ४८ जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाच्या बैठकीत उर्वरित जागांबाबत चर्चा झाली असून राष्ट्रीय अध्यक्षांना त्या जागांबाबत निर्णयाचे अधिकार देण्यात आले आहेत. याशिवाय काही जागा आघाडीतील घटक पक्षांना सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे त्या जागांवरील उमेदवार आम्ही जाहीर केलेले नाहीत.’’
मुख्यमंत्री योगी यांना गोरखपूरमधून उमेदवारी जाहीर झाल्याने ते अयोध्येतून लढतील या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. आदित्यनाथ प्रथमच विधानसभेची निवडणूक लढणार आहेत, तर उपमुख्यमंत्री मौर्य २०१२मध्ये सिरथूमधून निवडून आले होते.
राधामोहन दास अगरवाल हे गोरखपूर अर्बनमधून चार वेळा निवडून आले आहेत, परंतु त्यांचा हा मतदारसंघर आता मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना देण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रयागराज जिल्ह्यातील सिरथू हा शीतला प्रसाद यांच्या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री मौर्य यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी मंत्री धरर्मंसह सैनी यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्याने त्यांचा सहारनपूरमधील नाकूर मतदारसंघातून मुकेश चौधरी यांना उमेदवारीचा लाभ मिळाला आहे.
लक्ष्मी नारायण चौधरी (मथुरेतील छटा), सुरेश राणा (शामली- ठाणे भवन), श्रीकांत शर्मा (मथुरा), सुरेश खन्ना (शाहजहानपूर), कपिलदेव अग्रवाल (मुझफ्फरनगर), अतुल गर्ग (गाझियाबाद) यांचा या यादीत समावेश असलेले सध्याचे मंत्री आहेत, अनिल शर्मा (बुलंदशहरमधील शिकारपूर), संदीप सिंग (अलिगढमधील अत्रौली), जीएस धर्मेश (आग्रा कांट), गुलाबो देवी (संभलमधील चंदौसी), बलदेव सिंग औलाख (रामपूरमधील बिलासपूर) आणि महेश गुप्ता (बदायूँ) या योगी मंत्रिमंडळातील सदस्यांनी या यादीत स्थान मिळवले आहे.
माजी मंत्री धरमपाल सिंह यांना आंवला (बरेली) विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तराखंडच्या माजी राज्यपाल आणि भाजपच्या उपाध्यक्षा बेबी राणी मौर्य यांना आग्रा (ग्रामीण) येथून उमेदवारी देण्यात आली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र पंकज सिंह पुन्हा नॉएडा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपचे विद्यमान आमदार संगीत सोम यांना सरधना (मेरठ) येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येतून लढतील, असा अंदाज होता. समाजवादी पक्षात प्रवेश केलेले तीन मंत्री आणि सात आमदारांपैकी बहुतांश पूर्व उत्तर प्रदेशातील आहेत. मुख्यमंत्री योगी अयोध्येतून लढले तर त्यांच्या उपस्थितीमुळे पूर्व उत्तर प्रदेशातील अधिक जागांवर ते प्रभाव पाडू शकतील, असे गृहीत धरण्यात येत होते. परंतु पक्षातील पडझडीच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या जागांवरच पक्षाने लक्ष केंद्रित केल्याचे सांगण्यात येते.

Leave a Reply