(राजकीय दीर्घकथा, लेखक – अविनाश पाठक)
ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना बोलून प्रशांतने आश्विनीची बदली मुंबईला करून घेतली. मलबार हिलला त्यांना बंगलाही मिळाला होता. आश्विनीला मंत्रालयात उद्योग खात्यात अंडर सेक्रेटरी म्हणून पोस्टिंग झाले. या दरम्यान निवडणूकांमुळे बाजूला राहिलेले बाळाचे बारसेही आटोपले. “या बाळाचा जन्म सर्वांनाच आल्हाददायक ठरला आहे. त्यामुळे बाळाचे नाव आल्हाद असे ठेवू या” असे आजीने सुचवल्यामुळे आल्हाद हे नाव ठेवले गेले. थोड्याच दिवसात आल्हादसह आश्विनी मुंबईला रवाना झाली. आल्हाद लहान असल्यामुळे त्याला सांभाळायला कधी माधुरीताई तर कधी शालिनीताई जाऊन राहतील असे ठरले होते. त्यानुसार या दोघांसह शालिनीताई सुद्धा मुंबईत मलबार हिलच्या बंगल्यात रवाना झाल्या. मुंबईत आल्यावर प्रशांत आणि आश्विनीचे रुटीन आयुष्य सुरु झाले. सकाळी उठल्यापासून प्रशांतला फोन येणे सुरु व्हायचे. त्यातच तयार होऊन बाहेर निघेपर्यंत बंगल्यावर भेटायला येणाऱ्यांची गर्दी झालेली असायची. आता घरात सर्व कामांना माणसं होती. लक्ष ठेवायला शालिनीताई सुद्धा असायच्या. सकाळी 9.30 पर्यंत स्वतःचे आणि आल्हादचे आटोपून आश्विनी मंत्रालयाकडे निघायची. त्याच दरम्यान अनेकदा प्रशांतही निघत असे. मग कारमध्ये सोबत जायचे. मात्र कारमध्येही एकमेकांचे निवांत बोलणे होत नसे. त्याकाळात मोबाईल नवीनच आले होते. प्रशांतचा मोबाईल सतत वाजत असायचा. आणि मोबाईल बंद असला तर कधी डोके फाईलमध्ये असायचे तर कधी समोरच्या सीटवर बसलेल्या पीएंशी चर्चा सुरु असायची. एकदा मंत्रालयात पोहोचले की दिवसभर एकमेकांच्या भेटी दूरापास्तच असायच्या. संध्याकाळी प्रशांतची घरी येण्याची निश्चित वेळही नसायची. सुरुवातीला हा जीवनक्रम रुजायला जरा जडच गेले. मात्र हळूहळू सवय झाली.
जसे जसे दिवस जात होते तसा तसा आल्हाद मोठा होत होता. हळूहळू तो शाळेतही जाऊ लागला. आता कुटुंब विस्तार हवा असा सर्वच ज्येष्ठांचा आग्रह झाल्यामुळे प्रशांत आणि आश्विनीने दुसरा चान्स घेतला. यावेळी दोघांनाही मुलगीच हवी होती. झालेही तसेच. यावेळी सुरेख अशी मुलगी जन्माला आली. यथावकाश बारसे करून तिचे नाव धनश्री ठेवले गेले. याच दरम्यान पुन्हा निवडणूका आल्या. यावेळीही प्रशांत दणदणीत बहुमताने विजयी झाला. याही वेळी सत्ता त्यांच्याच पक्षाची होती. त्यामुळे मंत्रीमंडळ यांच्याच पक्षाने बनवले. यावेळी अजय पाटील हे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री बनले. प्रशांतचे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे त्यांनी प्रशांतला राज्यमंत्री पदावरून कॅबिनेटमंत्री बनवले. यावेळी प्रशांतकडे ऊर्जा खात्याचा कार्यभार दिला गेला. या दरम्यान आश्विनीही अंडर सेक्रेटरी पदावरून प्रमोट होऊन डेप्युटी सेक्रेटरी झाली होती. धनश्री लहान असल्यामुळे कमी त्रासाचे पोस्टींग हवे अशी तिची इच्छा होती. त्यामुळे मग सांस्कृतिक खात्यात डेप्युटी सेक्रेटरी म्हणून ती रुजू झाली. प्रशांत आणि आश्विनी या दोघांनीही आधी ठरल्यानुसार एकमेकांना त्यांच्या खात्यापासून वेगळे ठेवले होते. त्यामुळे सभागृहात किंवा प्रशासनात एकमेकांचा फारसा संपर्क येतच नव्हता. त्यातही आश्विनीकडे अनेक लोक यायचे. “मॅडम देशमुख साहेबांशी बोलून या खात्यातलं हे काम आम्हाला करून द्या” अशी गळ घालायची. मात्र आश्विनी त्यांना गोड शब्दात टाळत असे. हाच प्रकार प्रशांतच्या बाबतीत देखील व्हायचा. तोही अशी कामे टाळायचाच. त्यामुळे दोघांच्याही कामामध्ये कुठेही संघर्ष येत नव्हता.
अशी दोन वर्ष गेली आणि राज्यात काहीसे परिवर्तन झाले. अजय पाटलांना काही कारणाने राजीनामा द्यावा लागला. त्यांना केंद्रात घेतले गेले. त्यांच्या जागी मराठवाड्यातील विलास चव्हाण मुख्यमंत्री झाले. या मंत्रीमंडळात प्रशांतला अर्थमंत्रीपद दिले गेले. अर्थमंत्री म्हणूनही प्रशांतने आपली चांगलीच छाप पाडली. राज्याला त्याने तीन विकासाभिमुख अर्थसंकल्पही दिले.
असेच दिवस पुढे जात होते. आल्हाद १० वर्षाचा आणि धनश्री ५ वर्षाची झाली होती. या दरम्यान पुन्हा निवडणूका आल्या. निवडणूका आल्या की प्रशांत मतदारसंघात ठाण मांडून बसत असे. त्यावेळी आश्विनी मुंबईत घरचा कारभार सांभाळयाची. ती मंत्रालयात असल्यामुळे तिच्याकडे नागपूर जिल्ह्याच्या निवडणूकांचा कोणताही कार्यभार येत नसे. तरीही या निवडणूकीत निवडणूक आयुक्तांनी प्रत्येक उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडे एक-एक मतदारसंघ वाटून दिला होता. त्या मतदारसंघातल्या निवडणूकीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्या अधिकार्यावर होती. योगायोगाने आश्विनीकडे प्रशांत लढवत असलेल्या उमरेड मतदारसंघाचीच जबाबदारी दिली गेली. हा प्रकार अडचणीचा ठरणारा होता. त्यावेळी मुख्य सचिवांशी बोलून तिने मुंबईतला एक मतदारसंघ आपल्याकडे घेतला आणि संभाव्य अडचणीतून सुटका करून घेतली.
यावेळची निवडणूक जरा अडचणीचीच ठरणार होती. मतदारसंघात बरेच स्पर्धक तयार झाले होते. त्याशिवाय राज्यातही सत्ताधारी पक्ष तुटला होता आणि अनेक दिग्गज विरोधीपक्षाला जाऊन मिळाले होते. त्यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे होते. आश्विनीला तर नागपूरला जाऊन राहणे शक्य नव्हते. मात्र घरची इतर सर्व मंडळी प्रशांतच्या सोबतीने खंबीरपणे उभी होती. यावेळी आल्हादसुद्धा हौशीने बाबांच्या निवडणूकीची गंमत बघायला म्हणून काही दिवस नागपुरात जाऊन राहिला होता. तो दररोज फोनवर आश्विनीला सर्व वृत्तांत सांगत असेच. अपेक्षेनुसार निवडणूक अटीतटीची झाली तरीही निसटते बहुमत घेऊन पक्ष पुन्हा सत्तेत आला. प्रशांतसुद्धा चांगल्या मताधिक्क्याने विजयी झाला. पुन्हा एकदा अजय पाटील मुख्यमंत्री झाले. यावेळी त्यांनी प्रशांतला महसूल खात्याचा मंत्री बनवले. ही पाच वर्षाची कारकीर्द प्रशांतच्या राजकीय वाटचालीत एकदमच वेगळे वळण देणारी ठरली. महसूल मंत्री म्हणजे प्रमुख खाते म्हणूनच ओळखले जायचे. मुख्यमंत्र्यांच्या खालोखाल प्रशांतचा दर्जा होता. अनेकदा मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठकही प्रशांतच्या अध्यक्षतेखाली होत असे. त्यामुळे प्रशासनात आणि राजकारणात त्याचे वजन चांगलेच वाढले होते.
याच काळात आश्विनीचेही प्रमोशन होऊन ती सेके्रटरी झाली होती. काही काळ परिवहन खात्याची सेक्रेटरी तर काही काळ बृन्हमुंबई जिल्ह्याची जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावर आली. दोन्ही वेळा तिने आपल्या जबाबदारीला योग्य असा न्याय दिल्यामुळे एक वजनदार सनदी अधिकारी म्हणून तिचे नाव घेतले जाऊ लागले.
ही पाच वर्ष अशीच बघता बघता निघून गेली. प्रशांत राजकारणात व्यस्त होता. त्यामुळे नोकरी आणि घर अशा दोन्ही जबाबदाऱ्या आश्विनीच सांभाळीत होती. नाही म्हणायला घरी आई म्हणजे माधुरीताई आणि सासूबाई म्हणजेच शालिनीताई आळीपाळीने मुंबईत येऊन राहायच्या.त्यामुळे टेंशन फारसं राहयचे नाही. बघता बघता आल्हाद १० वी पर्यंत पोहोचला होता. शिक्षणात तो चांगलाच होता. त्यामुळे फारसा प्रश्न नसायचा. धनश्री देखील आता सहावीत आली होती. दोघेही मुंबईच्याच शाळेत शिकत होते. एकूणच सर्व काही सुरळीत सुरु होते. पाच वर्षांनी पुन्हा निवडणूका आल्या. यावेळच्या निवडणूका खूपच अटीतटीच्या होत्या. राज्यातल्या दोन प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन सत्ताधारी पक्षाला आव्हान दिले होते. त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत काय होईल हे सांगता येत नव्हते. यावेळी राज्यातला ज्येष्ठ मंत्री असल्यामुळे प्रशांतला फक्त मतदार संघातच चिकटून राहता येत नव्हते. पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून राज्यभर दौरा करावा लागायचा. सुदैवाने नागपुरात प्रदीप आणि रमेश हे त्याचे दोघे भाऊ आणि अन्य विश्वासू कार्यकर्ते मतदार संघाची धुरा सांभाळीत होते. अटीतटीच्या निवडणूकीत आपल्या धडक कामांच्या आणि स्वच्छ प्रतिमेच्या जोरावर प्रशांत निवडून आला खरा मात्र राज्यात त्यांचा पक्ष माघारला होता. दोन प्रमुख विरोधी पक्षांनी निवडणूकीपूर्वीच युती केली असल्यामुळे त्यांच्या बाजूने चांगले मतदान झाले. परिणामी त्यांनी विधानसभेत निसटते का होईना पण बहुमत मिळवले होते. काही अपक्षांच्या मदतीने त्यांनी सरकार बनवले आणि कारभार सुरु केला. या दरम्यान अजय पाटलांनी दिल्लीच्या राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यात पक्षाचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता प्रशांतच होता. सहाजिकच विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद प्रशांतकडे आले. सतत १५ वर्ष मंत्रीपदाचा अनुभव घेतल्यावर आता एका वेगळ्या जबाबदारीला सामोरे जाण्याची वेळ प्रशांतवर आली होती. मात्र आपल्या अभ्यासू आणि धडाकेबाज शैलीने अल्पावधीत प्रशांतने विरोधी पक्षनेता म्हणून स्वतःचा दरारा निर्माण केला. प्रशांत बोलायला उभा राहिला की विरोधी बाकावरचे ज्येष्ठ मंत्री सुद्धा विचारात पडायचे. विरोधी बाकावर बसून त्याने पाच वर्ष राज्यातल्या अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांना वाचा फोडली होती. या काळात आश्विनी पुन्हा प्रमोट होऊन प्रधान सचिव झाली होती. तिच्याकडे सिंचन, पर्यावरण, ऊर्जा अशा खात्यांचा कार्यभार होता. प्रशांतच्या धडाकेबाज शैलीने विरोधकांना त्याला अडचणीत आणणे कठीण जायचे. तोच प्रकार आश्विनीच्या बाबतही होता. तिची स्वच्छ प्रतिमा आणि नियमानुसार काम करताना जनसामान्यांचाही विचार करून निर्णय घेण्याची पद्धत यामुळे तिलाही कुठेच अडचणीत आणता येत नव्हते. असे असले तरी सभागृहात सिंचन, पर्यावरण, ऊर्जा अशा खात्यांचे प्रश्न आले आणि त्या मुद्यांवर प्रशांतने सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली की विधानसभा अध्यक्ष मिष्किलपणे हसत म्हणायचे, ” विरोधी पक्षनेत्यांना घरी वहिनींनी बरोबर ब्रिफिंग केलेले दिसत नाही”. त्यांच्या अशा कॉमेंटवर मग सभागृहात एकच हशा पिकायचा आणि सभागृहातले तणावाचे वातावरण निवाळायला मदत व्हायची. अनेकदा समोरचे मंत्रीही सांगायचे की “आम्ही सचिवांना निर्देश देतो की त्यांनी विरोधी पक्ष नेत्यांना प्रत्यक्ष भेटून या संदर्भात माहिती द्यावी”. एकदा सिंचन मंत्र्यांनी अशी कॉमेंट केली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी मिष्किलपणे उठून उभे राहत सूचना केली “अध्यक्ष महोदय, आम्ही सचिवांना आदेश देतो मात्र आपण सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांना निर्देश द्या की त्यांनी सचिवांना कार्यालयात न जमल्यास घरी तरी वेळ द्यावा. कारण विरोधी पक्ष नेते सरकारच्या सिंचन सचिवांना ज्या की त्यांच्या गृहसचिवही आहेत, त्यांना बिल्कूल वेळ देत नाहीत अशी तक्रार कानावर आली. वेळ दिला नाही तर विरोधी पक्ष नेत्यांचे गैरसमज दूर होणार नाहीत, म्हणून आपण स्पष्ट निर्देश द्यावेत” असे मुख्यमंत्र्यांनी हसत हसतच सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या सूचनेवर सभागृह हास्याकल्लोळात डुंबून गेले.
अविनाश पाठक