पवार – परब यांच्यात होणाऱ्या चर्चेमुळे चंद्रकांत पाटील यांच्या पोटात का दुखते? – हसन मुश्रीफ

मुंबई : १४ जानेवारी – “ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीत एकजूट राहिली आहे. याची पोटदुखी असल्याने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पवारांवर टीका करत आहेत.” असा टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला, आज हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले. “राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने तीन महिने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब हे मुख्यमंत्री पदाचा, एसटी कर्मचारी संघटनेशी घनिष्ठ संबंध असलेले शरद पवार यांच्याकडे मार्गदर्शनासाठी जात आहेत. या चर्चेतून मार्ग निघत आहे. अशावेळी पवार – परब यांच्यात होणाऱ्या चर्चेमुळे चंद्रकांत पाटील यांच्या पोटात का दुखते?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत, शरद पवार यांच्यामुळे महाविकासआघाडी घट्ट राहिल्याचे दुःख चंद्रकांत पाटील यांना असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
तसेच, पंतप्रधानांनी करोना नियंत्रणाबाबत बोलावलेल्या कालच्या या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे अनुपस्थित होते, असे नमूद करून मुश्रीफ म्हणाले, “करोनाबाबत चंद्रकांत पाटील यांची मतं वेगळीच आहेत. करोना हा रोगच नाही त्यामुळे टाळेबंदी लागू करू नये, बंधने घालू नये असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे हे बोलणे आश्चर्यकारक आहे.” असा टोलाही त्यांनी लगावला.
“शिवसेनेला हे कळत नाही की त्यांना पूर्णपणे संपवण्याचा एक ‘प्लॅन’ सुरू आहे”
राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर प्रदेश व अन्य राज्यात निवडणूक लढवत आहे. इतर राज्यात निवडणूक लढवून तोंड फोडून घेत आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यावर मुश्रीफ म्हणाले, “आम्ही तोंड फोडून घ्यायचे की काय करायचे हे जनता ठरवेल. पक्षाचा देशभर विस्तार करण्याच्या दृष्टीने आमची भूमिका रास्त आहे.” तसेच, मुश्रीफ यांना कागलच्या बाहेर काही कळत नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावर मुश्रीफ यांनी निदान मला कागल पुरते तरी कळते असे म्हणाल्या बद्दल चंद्रकांत पाटील यांचा आभारी आहे, असा अशी खोचक टिप्पणी केली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी संजय मंडलिक यांनी काही हालचाल केली, तर भाजपा पाठींबा देईल, या विधानावर मुश्रीफ म्हणाले , “चंद्रकांत पाटील यांचे ज्ञान अगाध आहे. विनय कोरे यांच्या भूमिकेमुळे संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील आसुरलेकर यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. पुढे काय होणार हे पाटील यांना माहीत नाही का? चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात काहीच कळत नाही.”, असा टोलाही त्यांनी लगावला.

Leave a Reply