धर्मसंसदमधील द्वेषपूर्ण भाषणांविरोधात पहिली कारवाई, जितेंद्र सिंह त्यागीला अटक

नवी दिल्ली : १४ जानेवारी – हरिद्वारममध्ये द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी पोलिसांनी पहिली अटक केली आहे. पोलिसांनी जितेंद्र सिंह त्यागीला अटक केली आहे. दरम्यान अटकेची कारवाई केल्यानंतर यती नरसिंहानंद यांनी तुम्ही सर्व मरणार अशा शब्दांत पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला आहे. द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात यती नरसिंहानंद आरोपी आहेत. उत्तराखंडमधील हरिद्वार येथे वादग्रस्त यती नरसिंहानंद यांनी आयोजित केलेल्या हिंदूंच्या धार्मिक मेळाव्यात मुस्लिमांविरोधात विधानं करण्यात आली होती.
पोलिसांनी त्यागीला अटक केली असून ही पहिलीच अटक आहे. त्यागीला याआधी वसीम रिझवी नावाने ओळखलं जात होतं. दरम्यान उत्तराखंड पोलिसांनी याप्रकरणी यती नरसिंहानंद आणि साध्वी अन्नपूर्णा यांना हजर होण्यासाठी नोटीस बजावली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत पोलीस अधिकारी त्यागीला ताब्यात घेत असताना यती नरसिंहानंद यांना सहकार्यासाठी विनंती करत असल्याचं दिसत आहे. कारमध्ये बसलेले त्यागी पोलिसांना तुम्ही त्यागीला अटक का करत आहात? अशी विचारणा करत असल्याचं दिसत आहे. यावेळी अधिकारी गुन्हा दाखल झाल्याने अटक करणं गरजेचं असल्याचं समजावून सांगताना दिसत आहेत.
“त्या तीन प्रकरणांमध्ये त्याच्यासोबत मीदेखील आहेत. त्याने हे एकट्यानेच केलं का?,” अशी विचारणा यती नरसिंहानंद यावेळी पोलिसांना करतात. यावेळी पोलीस अधिकारी यती नरसिंहानंद यांना कारमधून बाहेर यावं, जेणेकरुन पुढील प्रक्रियेत अडथळा येऊ नये यासाठी विनंती करतात. मात्र यती नरसिंहानंद मागे हटण्यास तयार होत नाहीत.
अधिकारी यावेळी, त्यागींना परिस्थिती समजत आहे असं सांगतात त्यावेळी यती नरसिंहानंद म्हणतात, “पण मी नाही…आमचा पाठिंबा असल्यानेच ते हिंदू झालेत”.
उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी मुस्लीम धर्म सोडत हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी जितेंद्र सिंह नारायण त्यागी हे नवं नाव स्वीकारालं आहे. गाझियाबादमधील दासना देवी मंदिराचे प्रमुख पुजारी असणारे यती नरसिंहानंद यांनी त्यांच्या धर्मातराच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. याआधीही त्यांनी अशा वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत.
यती नरसिंहानंद यांनी यावेळी पोलिसांना “तुम्ही सगळे मरणार, तुमची मुलंही,” असं म्हणत संताप व्यक्त केला. त्यागीला रुकरी येथून अटक करण्याक आला. द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी यती नरसिंहानंद, त्यागी, अन्नपूर्णा यांच्यासहित १० जणांची नावं एफआयआरमध्ये आहेत.
सुप्रीम कोर्टाने बुधवारी उत्तराखंड सरकारला याप्रकरणी १० दिवसांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर करण्यात आलेली ही पहिली अटक आहे.

Leave a Reply