गोंदियात वाघाची शिकार, मृत वाघाचे दात व नखे गायब

गोंदिया : १४ जानेवारी – अर्जुनी मोर तालुक्यातील रामघाट बीटाच्या कक्ष क्र. २५४ मध्ये आज, सकाळी ११ वाजता गस्तीवर असलेल्या वनपथकाला मृतावस्थेत वाघ आढळला. या घटनेमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.
अर्जुनी मोर वनपरिक्षेत्रांतर्गत रामघाट बीटाच्या कक्ष क्र. २५४ मध्ये वनकर्मचारी व वन मजूर सकाळी गस्त घालत असताना एक वाघ मृतावस्थेत आढळला. याची माहिती मिळताच उपवनसंरक्षक कुलराज सिंग, वनविभागाचे अधिकारी तसेच मानद वन्यजीव संरक्षक मुकूंद धुर्वे, सावन बहेकार हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांना मृत वाघाचे दात व नखे नसल्याचे आढळले. दोन दिवसापूर्वी वाघाचा मृत्यू झाला असून, शवविच्छेदनानंतरच वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या वाघाचे वय चार वर्ष असून परिसरातील वाघांचे पायाचे ठशांसोबत मृत वाघाच्या पायांचे ठसे जुळले नसल्याने तो बाहेर परिसरातून आल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात मागील कालावधीत तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडून वनप्राण्यांची शिकार केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. त्यातच रामघाट परिसरात आढळलेल्या वाघाची शिकार सुध्दा विद्युत प्रवाह सोडून करण्यात आल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तसेच वाघाचे अवयव गायब असल्याने त्याची शिकार केल्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात आहे.

Leave a Reply