अभिनेते किरण मानेंच्या समर्थनार्थ जितेंद्र आव्हाड, रोहित पवार मैदानात

मुंबई : १४ जानेवारी – अभिनेते किरण माने यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकल्यावरून सध्या सोशल मीडियावर आणि त्यासोबतच राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर सातत्याने मांडलेल्या राजकीय भूमिकांमुळे त्यांना मालिकेतून काढून टाकल्याचं सांगितलं जात असताना खुद्द किरण माने यांनी देखील त्याला दुजोरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांकडून आणि राजकीय नेत्यांकडून देखील पोस्ट केल्या जात आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विटरवरून संबंधिच वाहिनी आणि विरोध करणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत ठणकावलं आहे.
“स्टार प्रवाहावरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील विलास पाटील पात्र साकारणाऱ्या किरण माने या अभिनेत्यास फुले, शाहु, आंबेडकर विचारांची कास धरुन सोशल मीडियावर लिहितो, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो म्हणून अचानक मालिकेतून काढून टाकले आहे”, असं आव्हाड म्हणाले आहेत.
या महाराष्ट्रात दादा कोंडके, पु.ल.देशपांडे, निळू फुले या कलाकारांनी कधी टीका केली तरी त्यांच्या विचारांचा आदर करीत त्यांचा सन्मानच केला. याद राखा, हा महाराष्ट्र वैचारीक वारसा जोपासतो. तुमच्या विरोधात लिहिले म्हणून तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही”, असं आव्हाडांनी आपल्या ट्वीटरवर म्हटलं आहे.
“स्टार प्रवाहने एका नवीन वादाला तोंड फोडले आहे. त्यांनी ह्यात पडायची गरज नव्हती”, असं देखील आव्हाड म्हणाले आहेत.
दरम्यान, किरण मानेंनी या सगळ्या प्रकारावर ठाम भूमिका मांडली आहे. “सत्ताधाऱ्यांना जाब विचारणं हे सजग नागरिकाचं कर्तव्य आहे. कोणत्याही सरकारविरोधात बोलणं हा माझा अधिकार आहे. माझ्या राजकीय पोस्टचा आणि कामाचा काय संबंध आहे? मी माझा लढा सुरूच ठेवणार आहे. यात माझा जीव गेला, बदनामी झाली तरी हरकत नाही”, असं किरण मानेंनी स्पष्ट केलं आहे.
“अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा निर्घृण खूनच”
आमदार रोहीत पवार यांनी देखील या सर्व प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दडपशाही वृत्तींना मोठा अडसर असल्याने ही वृत्ती नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठेचण्याचा प्रयत्न करते. राजकीय भूमिका मांडली असता एखाद्या कलाकाराला मालिका सोडण्याची वेळ यावी, याला दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खूनच म्हणावा लागेल”, अशा शब्दांत रोहीत पवार यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
केवळ मत व्यक्त केले म्हणून अभिनेते किरण माने यांना मालिकेतून बाहेर पडावे लागले हे सत्य असेल तर मग आपण सर्वांनी देखील सत्यासोबत उभे राहणे हाच खरा संवैधानिक धर्म आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी होणारी छेडछाड मूकपणे पाहणे किमान महाराष्ट्रात तरी शोभणारे नाही”, असं आपल्या ट्वीटमध्ये रोहीत पवार यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply