कालिचरण महाराज वर्धा पोलिसांच्या ताब्यात

वर्धा : १२ जानेवारी – राष्ट्रपिता महात्मा गांधीजींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजवर वर्ध्येत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कालीचरण रायपूरच्या सेंट्रल जेलमध्ये याप्रकरणी अटकेत होता. त्यानंतर वर्धा शहर पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता ताब्यात घेत त्याला वर्धेला आणले. रात्री तीन वाजताच्या दरम्यान कालीचरण यांना कडेकोट पोलीस बंदोबस्तात आणण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. त्यांनतर सेवाग्राम पोलीस ठाण्यात विचारपूस करण्यात आली.
आज सकाळी कडक पोलीस बंदोबस्तात त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने दोन दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश एम. वाय. नेमाडे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. तर जामीन अर्जावर दुपारनंतर सुनावणी होणार असल्याची माहिती कालीचरण महाराजांचे वकील विशाल टीबडेवाल यांनी दिली.
रायपूरच्या रावणभाठा मैदान येथे आयोजित दोन दिवसीय धर्म संसदच्या शेवटच्या दिवशी धर्मगुरु कालीचरण महाराज याने नथूराम गोडसे यांना नमन केले. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत विवादित वक्तव्य केले . ” नथूराम गोडसेजींना नमस्कार आहे… देशाच्या विभाजनासाठी महात्मा गांधी जबाबदार आहेत…पोलीस नसते तर आतापर्यंत आपले सत्यानाश झाले असते…जोपर्यंत राजा कट्टर हिंदुवादी नसेल, तोपर्यंत पोलीस हिंदूंना सपोर्ट नाही करु शकत…” असे वादग्रस्त वक्तव्य त्याने केले. कालीचरण महाराजांच्या विवादित भाष्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यांच्याविरोधात रायपूरच्या टिकरापारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply